मुंबई – ‘स्टॅच्यु ऑफ लिबर्टी’चा पहिला पुतळा हा गुजरात येथे बांधण्यात आला. ‘ड्रीम सिटी प्रोजेक्ट’ आणि हिर्यांचा व्यापारही गुजरात राज्यात न्यावासा वाटतो. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या राज्याविषयी इतके प्रेम असेल, तर मग आपल्याला आपल्या मराठी भाषेविषयी प्रेम का नसावे ?’, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत नाही, तर कोणत्याही व्यक्तीला आपल्या राज्याविषयी आपल्या भाषेविषयी किती प्रेम असते, हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मराठी हीच आपली ओळख आहे आणि आपण तीच ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक राज्य आणि प्रत्येक देश आपापली भाषा जपत असतो. मराठी भाषेचे प्रभूत्व जाणून घ्यायचे असेल, तर एकदा नक्कीच महाराष्ट्र भ्रमंती करा. तेव्हा तुम्हाला कळेल. आपण इतर गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्राकडे सर्वात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा दिवा विझे’. तुम्ही आपली भाषा मरू देऊ नका. मराठीत बोलायला हवे. मराठी भाषा भवन होईल; मात्र कुणीही समोर आले, तरी आपण मराठीत बोलायला हवे. मी आंदोलन केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेकांना कंठ फुटला. अनेकजण मराठीत बोलायला लागले. याचाच अर्थ त्यांना मराठी भाषा येत होती. त्यामुळे तुम्ही प्रथम आपली भाषा जपणे आवश्यक आहे.