Close Unauthorized  Madrassa:अनधिकृत मदरसा बंद करण्यासाठी धोपेश्वर परिसरातील ग्रामस्थांना करावे लागले उपोषण !

राजापूरच्या तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी २९ फेब्रुवारीपर्यंत निर्णय देण्याचे उपोषणकर्त्यांना दिले आश्वासन !

धोपेश्वर येथे उपोषण करणार्‍या ग्रामस्थांशी चर्चा करतांना तहसीलदार सौ. शीतल जाधव

राजापूर – शहरालगतच्या धोपेश्वर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पन्हळे तर्फे राजापूर या गावामध्ये चालू असलेला अनधिकृत मदरसा बंद करावा, असा ठराव ग्रामसभेमध्ये पारित झाला आहे. याविषयी ग्रामपंचायत, महसूल आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असतांनाही न्याय मिळत नसल्याने शेवटी ग्रामस्थांनी नाइलाजास्तव प्रजासत्ताकदिनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण केले. ग्रामस्थांनी केलेल्या उपोषणानंतर तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना ‘२९ फेब्रुवारीपर्यंत या विषयावर निर्णय दिला जाईल’, असे आश्वासन दिले. ठाकरे गटाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनीही याविषयी उपोषणस्थळी ग्रामस्थांशी चर्चा केली.

या उपोषणाला पन्हळे, धोपेश्वर, बारसू या गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याखेरीज या आंदोलनाला राजापूर येथील सकल हिंदु समाजानेही पाठिंबा दर्शवला आहे. या वेळी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकार्‍याला घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमारही केला होता.

याविषयी ग्रामस्थांचे म्हणणे असे की,

१. धोपेश्वर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये पन्हळे तर्फे राजापूर येथे एका शेतघरामध्ये ग्रामपंचायत अथवा शासनाची कोणतीही अनुमती न घेता मदरसा चालू करण्यात आला आहे. या मदरशामध्ये परराज्यातील मुले रहात असून त्यांचा गावात स्वैराचार चालू झाल्याने ग्रामस्थांनी याविषयी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती.

२. या तक्रारीनंतर ७ नोव्हेंबर २०२३ या दिवशीच्या ग्रामसभेमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी ग्रामस्थांनी या मदरशाला विरोध दर्शवत अनधिकृत मदरसा बंद करण्याचा ठराव बहुमताने संमत केला होता.

३. मदरशाला ग्रामस्थांचा विरोध असतांनाही ग्रामपंचायतीने शेतघर मालकाला १५ दिवसांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत संबंधितांनी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायतीने मदरशावर अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही.

४. राजापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गावामध्ये परराज्यातील तरुण मुले वास्तव्याला आहेत. ही मुले नेमकी परराज्यातील आहेत कि अन्य कुठली आहेत ? याविषयी ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत, तसेच मदरशामध्ये रहाणार्‍या मुलांचा गावामध्ये स्वैर वावर असल्याने गावामध्येही भीतीचे वातावरण आहे.

संपादकीय भूमिका

  • अनधिकृत मदरसा बंद करण्यास अनेक वेळा पाठपुरावा करावा लागणे आणि त्यासाठी ग्रामस्थांना उपोषण करावे लागण्यासाठी धोपेश्वर भारतात आहे कि पाकिस्तानात ? अनधिकृत मदरसा प्रशासनाला दिसला कसा नाही ? अनधिकृत मदरसा न दिसणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !
  • अनधिकृत मदरसा बंद करण्यास वारंवार मागणी होत असतांनाही त्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? याचेही उत्तर प्रशासनाने जनतेला द्यायला हवे !
  • ग्रामस्थांनी उपोषणाचे पाऊल उचलल्यानंतर जागे झालेले प्रशासन जनहित साधेल का ?