Padma Awards 2024 : पद्म पुरस्कार घोषित : ५ पद्मविभूषण, १७ पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री !

त्रिपुरातील शांतीकाली आश्रमाचे प.पू. स्वामी चित्तरंजन महाराजांना पद्मश्री पुरस्कार जाहीर !

नवी देहली – प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा एकूण १३२ जणांना पद्म पुरस्कार घोषित झाले असून यांत ५ जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण, तर ११० जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. यांमध्ये महाराष्ट्रातील १२ जणांचा, तर गोव्यातील एकाचा समावेश आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांच्यासह ५ जणांना भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार घोषित झालेली काही नावे !

१. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये कार्यरत त्रिपुरातील शांतीकाली आश्रमाचे प.पू. स्वामी चित्तरंजन महाराज यांना पद्मश्री !

२. देशाच्या पहिल्या महिला माहुत आसाम येथील पार्वती बरुआ यांना पद्मश्री !

३. अरुणाचल प्रदेश राज्यातील आयुर्वेदिक औषधांच्या तज्ञ यानुंग जमोह लोगो यांना पद्मश्री ! त्यांनी आतापर्यंत १० सहस्रांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. यासह १ लाख रुग्णांना ‘आयुर्वेदीय औषधे कशी वापरायची ?’, हे शिकवले आहे.

४. खेडेगावात अनेक दशके आरोग्य सेवा करणारे छत्तीसगडच्या नारायणपूर येथील हेमचंद मांझी यांनाही पद्मश्री पुरस्कार घोषित !

५. झारखंड येथील चामी मुर्मू यांनाही पद्मश्री पुरस्कार घोषित. त्यांनी गेल्या २८ वर्षांत २८ सहस्र महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला आहे.

६. बंगाल राज्यातील पुरुलिया सिंदरी गावातील आदिवासी पर्यावरणवादी दुखू माझी यांना पद्मश्री पुरस्कार ! त्यांनी वनीकरणासाठी अनन्यसाधारण प्रयत्न केले असून सायकलवर प्रवास करत ५ सहस्रांहून अधिक वडाची, आंब्याची आणि ब्लॅकबेरी यांची झाडे लावली आहेत.

७. हरियाणातील सिरसा येथील अपंग असलेले सामाजिक कार्यकर्ते गुरविंदर सिंह यांनाही पद्मश्री पुरस्कार दिला जाणार आहे. अनाथ, महिला आणि अपंग यांच्यासाठी त्यांनी पुष्कळ मोठे कार्य केले आहे.

८. अंदमान निकोबार येथील जैविक शेती करणारे के. चेल्लम्मल यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर !

९. केरळच्या कासारगोडचे तांदूळ उत्पादक शेतकरी सत्यनारायण बेलेरी यांना कृषी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी पद्मश्री जाहीर !

१०. आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्‍वनाथ देशपांडे यांनी मल्लखांबाला पुन्हा लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याने पद्मश्री घोषित !

११. ‘स्वर महेश्‍वरी’ या नावाने विख्यात उमा महेश्‍वरी डी. यांना पद्मश्री घोषित झाला आहे. त्या पहिल्या महिला हरिकथा प्रतिपादक असून संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे.

महाराष्ट्रातील १२ जणांना पद्म पुरस्कार, तर गोव्यात एकाला मिळणार पद्मश्री !

महाराष्ट्रातील १२ मान्यवरांपैकी प्रामुख्याने माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, ज्येष्ठ दिग्दर्शक दत्तात्रय अंबादास मायाळू उपाख्य राजदत्त, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, साहित्यिक होरमुसजी एन्.कामा, कुंदन व्यास, अश्‍विन बालचंद मेहता या ६ जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत.

गोव्यातील संजय अनंत पाटील यांना कृषी क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.