Pune Drugs Racket : पुणे येथील अमली पदार्थांची विक्री करणार्‍या ललित पाटील याच्या विरोधात ७ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !

अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील

पुणे : अमली पदार्थांची विक्री करणारा ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेने २ सहस्र ६०० पानांचे पुरवणी आरोपपत्र न्यायालयामध्ये सादर केले. ललित पाटील याला ‘ससून’मधून पसार होण्यासाठी सचिन वाघ याने साहाय्य केल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला असून, ४५ साक्षीदारांची सूचीही जोडण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.सी. बिराजदार यांच्या न्यायालयामध्ये हे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत या प्रकरणामध्ये ४ सहस्र ८०० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. या आरोपपत्रामध्ये ललितची मैत्रिण अर्चना कांबळे, अधिवक्त्या प्रज्ञा कांबळे उपाख्य प्रज्ञा माहिरे, ललितचा भाऊ भूषण पाटील, साथीदार अभिषेक बलकवडे, ‘रोझरी एज्युकेशन’चा भागीदार विनय अरहाना आणि त्याचा गाडीचालक दत्तात्रय डोके या आरोपींची नावे अंतर्भूत आहेत.