१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘हे जग उत्पन्न केल्यापासून त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्यामागे अद्भुत आणि अदृश्य अशी शक्ती काम करत असते. तिलाच ‘देव’ ही संज्ञा आहे. तिलाच कुणी ‘अल्ला’, कुणी ‘गॉड’, कुणी ‘प्रभु’, तर कुणी ‘ब्रह्म’, असे म्हणतात. ‘या शक्तीला ओळखणे’, हेच मनुष्याचे मुख्य कर्तव्य होय.’ – प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘सद्गुरूंची बोधवचने’, सुवचन क्र. ४)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
२ अ. माणूस अद्वैतात न रमता द्वैतात रमत असल्याने ‘तुझा देव, माझा देव’, असा भेद करू लागतो ! : ‘प.पू. कलावतीआईंचे हे फार सुंदर वचन आहे. ‘या वचनाचा अर्थ ज्याला समजला, त्याला आपल्या जन्माचे गुपित उमजले’, असे म्हणता येईल. आज आपल्याला धर्माधर्मांत तेढ निर्माण होतांना दिसते. काही लोक मुद्दाम दोन धर्म किंवा दोन पंथ यांत तेढ निर्माण करत असतात; परंतु ‘त्यामुळे समाजातील शांतता भंग पावते’, हे त्यांना कसे बरे समजत नाही ? यामागे कदाचित् राजकारण असेल किंवा काही अन्य कारणे असतील; परंतु प्रत्येक धर्म हा एका वैश्विक शक्तीला वेगवेगळ्या नावांनी ओळखत असतो. ‘जग चालवणारी एक फार मोठी शक्ती अदृश्य रूपामध्ये चराचरात वसत असते’, हे सर्वांना मान्य असते; परंतु माणूस अद्वैतात न रमता द्वैतात रमतो आणि ‘तुझा देव, माझा देव’, असे करू लागतो.
२ आ. अहंकारामुळे ‘मी करत असलेली उपासना मोठी’, असे प्रत्येकाला वाटते ! : बर्याच वेळा आपल्याला एकाच धर्मात अनेक देव पहाण्यास मिळतात आणि त्या देवांची भक्ती करणारे कट्टर विचारांचे असल्याचे आपल्याला पहावयास मिळते; परंतु ‘देव ही एक विशिष्ट अदृश्य, अनाकलनीय आणि कालातीत, अशी वैश्विक शक्ती आहे’, हे माणूस पूर्णपणे विसरून जातो अन् ‘माझा देव, तोच खरा देव’, असे अहंकाराने म्हणू लागतो. हा जो माझेपणा, अहंकार माणसात भरलेला आहे, त्यामुळे समाजाची वाताहात होते. प्रत्येक धर्मात त्या त्या देवाची उपासना करण्याचे मार्ग भिन्न असतात. त्याला काही भौगोलिक, ऐतिहासिक, तसेच सामाजिक अशी कारणे असतात; परंतु हे कोणी ध्यानात घेत नाही. शेवटी सगळे जण देवाचीच उपासना करत असतात; परंतु ‘मी करत असलेली उपासना मोठी !’, असे प्रत्येकाला वाटते.
२ इ. सर्व संतांनी आपापल्या ग्रंथामध्ये ‘देव हा एकच आहे आणि तुम्ही एकाच देवाची उपासना करा’, असे सांगितले आहे ! : वेगवेगळ्या देवांची उपासना, वेगवेगळ्या पोथ्या, तसेच वेगवेगळे ग्रंथ आपणांस पहावयास मिळतात; परंतु या सर्व ग्रंथांतून आपल्याला एकाच शक्तीचे वर्णन पहावयास मिळते. आपल्याच हिंदु धर्मात बघितले, तर ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दासबोध, संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराज यांचे अभंग, त्याचप्रमाणे अनेक संत-महंतांचे अभंग अन् गीते सर्वांना ओरडून हेच सांगतात की, देव हा एकच आहे आणि तुम्ही एकाच देवाची उपासना करा !
२ ई. सगुण उपासनेत मनुष्य वेगवेगळ्या देवांची पूजा करून द्वैतभाव जोपासतो ! : सगुण उपासना असली, तरीसुद्धा एकच सगुण रूप डोळ्यांसमोर ठेवून त्याची आयुष्यभर उपासना करा. आपण वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या देवांची उपासना करत असतो. त्यामुळे आपण या देवांमध्येही द्वैतभाव बघतो. ‘हा देव वेगळा, तो देव वेगळा, हा वनात रहातो, तो महालात रहातो’, अशी वेगवेगळी वर्णने आपण करत रहातो आणि प्रत्येक देवाची वेगवेगळ्या वारी साग्रसंगीत पूजा करतो.
२ उ. दुसर्यांची सेवा करतांना ‘साक्षात् भगवंताची सेवा करत आहोत’, असा भाव ठेवा ! : माणूस नेहमी सगुण उपासनेकडून निर्गुण उपासनेकडे वाटचाल करत असतो; किंबहुना त्याची तशी वाटचाल होणे महत्त्वाचे आहे; कारण देव अगदी जवळ असला, तरी तो आपल्याला दिसत नाही. ‘जिथे जिथे जीवन आहे, तिथे तिथे देव भरलेला आहे’, हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. दुसर्याची सेवा करण्यात आपल्याला आनंद वाटायला हवा; कारण ‘दुसर्याची सेवा, म्हणजे साक्षात् भगवंताची सेवा आहे’, असा भाव जर मनात उत्पन्न झाला, तर ‘माणसाकडून देवाचीच उपासना घडते’, असे संतांनी सांगून ठेवले आहे.
२ ऊ. देव चराचरात आहे ! : हे पुढील गाण्यातून स्पष्ट होते. प्रत्येकाला ‘देव कुठे आहे ?’, असा प्रश्न पडतो आणि मग तो देवाला शोधत फिरतो. हे सगळे प्रश्न कवीने देवाला विचारले आहेत; म्हणून मला ही कविता प्रातिनिधिक वाटते.
त्या फुलांच्या गंध-कोषी सांग तू आहेस का ?
त्या प्रकाशी तारकांच्या तू तेज का ?
त्या नभाच्या नीलरंगी होउनीया गीत का-
गात वायूच्या स्वराने, सांग तू आहेस का ?
मानवांच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का ?
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?
आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का ?
जीवनी संजीवनी तू माउलीचे दूध का ?
कष्टणार्या बांधवांच्या रंगसी नेत्रांत का ?
मूर्त तू मानव्य का रे ? बालकांचे हास्य का ?
या इथे अन् त्या तिथे रे सांग तू आहेस का ?
– सूर्यकांत खांडेकर
२ ए. देव आपल्या समोर कोणत्याही रूपात प्रगट होऊन आपल्याला संकटात मदत करत असतो ! : माणुसकी, सेवाधर्म, प्रेम, वात्सल्य, बंधूभाव, समता आणि आनंद, यांतूनही देव प्रगट होतो. देव आपल्या समोर कोणत्याही रूपात प्रगट होऊन आपल्याला संकटात मदत करत असतो; परंतु हे कळण्याइतके ज्ञान माणसाला असावे लागते; किंबहुना हे ज्ञान देवच त्याला देत असतो; म्हणून ‘माणसाने आपल्या मनात माणुसकी जागृत ठेवून समाजात वर्तन करावे’, असे मला वाटते. एका गाण्यात म्हटले आहे,
तुझे सर्वरंगी रूप उदारा ।
कळले सांग कुणाला ।
खेळ तुझा न्यारा, प्रभु रे ।
खेळ तुझा न्यारा ।।
– वंदना विटणकर
संत शिरोमणी तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात,
जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
चालवीशी हाती धरूनियां ।। १ ।।
चालों वाटे आम्हीं तुझाचि आधार ।
चालविसी भार सवें माझा ।। २ ।।
बोलों जातां बरळ करिसी तें नीट ।
नेली लाज धीट केलों देवा ।। ३ ।।
तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें ।
जालें तुझें सुख अंतर्बाहीं ।। ४ ।।
२ ऐ. ‘विश्व चालवणारी एकच शक्ती आहे’, याचे ज्ञान माणसाला झाल्यावरच त्याच्या जन्माचे सार्थक होईल ! : ‘संत तुकाराम महाराज यांना जळी, काष्ठी, पाषाणी सगळीकडे भगवंत दिसत होता’, असे वरील अभंगावरून आपल्याला कळून येते; म्हणून प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘हे जग चालवणारी एकच मोठी शक्ती आहे; पण माणसे त्या शक्तीला वेगवेगळी नावे देतात आणि उपासना करतात. ‘सर्व विश्व चालवणारी एकच शक्ती आहे’, हे जेव्हा माणसाला कळेल किंवा त्याला याचे ज्ञान होईल, त्याच वेळी मनुष्यजन्माचे सार्थक होईल.’
– (पू.) किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२३.९.२०२३)