(म्हणे) ‘श्रीराममंदिर भारतीय लोकशाहीवर कलंक !’ – पाकिस्तान

  • मुसलमानांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न

  • ज्ञानवापी, शाही ईदगाहसह देशातील अनेक मशिदींना धोका असल्याचाही दावा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेवरून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन प्रसारित केले आहे. यात त्याने म्हटले आहे की, आम्ही अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनेचा निषेध करतो. हे मंदिर बाबरी पाडून बनवण्यात आले आहे. उद्ध्वस्त मशिदीच्या जागी बांधण्यात आलेले मंदिर येणार्‍या काळात भारतीय लोकशाहीच्या कपाळावरील कलंक म्हणून राहील, अशी टीका करण्यात आली आहे. ‘भारतातील हिंदुत्वाची वाढती विचारसरणी धार्मिक सद्भाव आणि क्षेत्रिय शांतता यांसाठी मोठा धोका आहे. अशा प्रकारे भारतातील मुसलमानांना वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असेही या निवेदनात म्हटले आहे.

सौजन्य एएनआय न्यूज 

पाकने म्हटले की,

१. प्राचीन बाबरी ६ डिसेंबरला कट्टरतावाद्यांनी पाडली. दुर्दैवाची गोष्ट अशी की, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने उत्तरदायींना निर्दोष मुक्त केले आणि मशिदीच्या जागी मंदिर बांधण्याची अनुमती दिली. ३१ वर्षे हा खटला चालला आणि आज उद्घाटन झाले. हे भारतात एका समाजाचा प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसत आहे. हा भारतीय मुसलमानांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपात मागे ढकलण्याचा प्रयत्नांपैकी एक आहे.

२. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद यांच्या समवेत अनेक मशिदींना आता धोका निर्माण झाला आहे. त्यांनाही उद्ध्वस्त केले जाऊ शकते.

३. भारतातील उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रमुख राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी ‘बाबरीचे पतन आणि श्रीराममंदिराचे उद्घाटन या घटना पाकिस्तानच्या काही भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवण्यातील पहिले पाऊल आहे’, असे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय समाजाने भारतातील वाढत्या इस्लामद्वेषाकडे आणि विद्वेषी विधानांकडे लक्ष दिले पाहिजे.

४. संयुक्त राष्ट्रे आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारतामध्ये प्राचीन इस्लामी वास्तूंचे कट्टरतावाद्यांच्या गटांपासून वाचवण्यासाठी, तसेच भारतातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अधिकारांच्या सुरक्षेला निश्‍चित केले पाहिजे. पाकिस्तान यासाठी भारत सरकारकडे आग्रह करत आहे.

संपादकीय भूमिका 

  • पाकिस्तानमध्ये गेल्या ७५ वर्षांत हिंदूंचा वंशसंहार चालू असून येत्या काही वर्षांत पाकमधून हिंदूं नामशेष झाले, त्यांची मंदिरे नष्ट झाली, तर आश्‍चर्य वाटणार नाही. अशी स्थिती असतांना पाकने भारतावर बोट दाखवणे म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली’ असेच आहे !
  • पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !