अयोध्या त्रेतायुगासारखी दिसत आहे ! – मुख्य पुजारी सत्येंद्र दास

पुजारी सत्येंद्र दास

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर गर्भगृह दैवी रूपात दिसत आहे. त्रेतायुगात जेव्हा भगवान श्रीराम सिंहासनावर विराजमान झाले होते, त्या वेळी जे वातावरण होते, ते आज आहे. या वेळीही त्रेतायुगाची झलक पहायला मिळत आहे, असे वक्तव्य श्री रामललाचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी केले. ते पत्रकारांशी बोलत होते.

श्रीरामंदिरात भ्रमणभाषवर बंदी

श्रीराममंदिरात प्रवेश करण्यासाठी भाविकांना कडक सुरक्षेचे निकष पार करावे लागणार आहेत. मंदिरात सर्व प्रकारच्या विजेच्या वस्तू आणण्यास मनाई आहे. तेथे  भ्रमणभाष, कॅमेरा आदी वस्तू नेण्यावरही बंदी आहे. भाविकांनी मंदिरात जातांना पेढे, फळे किंवा अन्य वस्तूही नेऊ नयेत.

आरतीसाठी घ्यावा लागणार पास !

आरतीला उपस्थित रहाण्यासाठी भाविकांना श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून  पास घ्यावा लागेल. हा पास विनामूल्य असणार आहे. यासाठी आधारकार्डसह कोणतेही वैध ओळखपत्र आवश्यक आहे. सध्या केवळ ३० लोकांनाच आरतीच्या वेळी उपस्थित रहाण्याची अनुमती असणार आहे. भक्तांना सकाळी ६.३०, ११.३० आणि संध्याकाळी ६.३० वाजताच आरतीमध्ये सहभागी होता येईल. ऑनलाईन पास srjbtkshetra.org या संकेतस्थळाद्वारे प्राप्त केले जाऊ शकतात.

आरतीच्या वेळा

  • पहिली आरती पहाटे ४.३० वाजता : मंगला आरती ही देवाला जागे करण्यासाठी आहे.
  • दुसरी आरती सकाळी ६.३० वाजता : शृंगार आरतीच्या वेळी यंत्रपूजा, सेवा आणि बालभोग होईल.
  • तिसरी आरती ११.३० वाजता : राजभोग आरती (दुपारच्या नैवेद्याच्या वेळी) होईल. यानंतर रामलला अडीच घंटे विश्रांती घेतील. गर्भगृह बंद केले जाईल. या वेळी भाविक मंदिर परिसरात फिरू शकतात.
  • चौथी आरती दुपारी २.३० वाजता : यामध्ये अर्चक श्री रामललाला झोपेतून उठवतील.
  • पाचवी आरती संध्याकाळी ६.३० वाजता असेल
  • सहावी आरती रात्री ८.३० वा. : याला शयन आरती म्हटले जाईल. यानंतर श्री रामलला झोपतील.