पुणे – मार्च मासात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने महापालिकेची कामे मार्गी लागावीत, यासाठी आयुक्त विक्रमकुमार यांनी कामांचा आढावा घेतला. ‘वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील देखभाल दुरुस्तीसह इतर प्रकल्पांच्या कामांसाठी संमती घेऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करून फेब्रुवारी मास संपण्यापूर्वी ‘वर्कऑर्डर’ काढा’, असा आदेश त्यांनी दिला. ‘निविदा काढण्यास विलंब झाल्याने नालेस्वच्छता, तसेच पावसाळी गटारे स्वच्छ करण्याची कामे जून मासातही चालूच असतात. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्येच पावसाळ्यापूर्वीचा काळ जाणार असल्याने या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये; म्हणून नालेस्वच्छता आणि पावसाळी गटारांची स्वच्छता याची निविदा प्रक्रिया लवकर चालू करा’, असेही आयुक्तांनी सांगितले.