‘अयोध्येतील श्रीराममंदिराचे उद्घाटन दिनांक २२.१.२०२४ या दिवशी होत आहे. क्रूरकर्मा बाबराने ध्वंस केलेल्या या मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी सुमारे ५०० वर्षे साधूसंत, संप्रदाय, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू यांनी दिलेल्या प्रखर लढ्याला अखेर यश आले. या लढ्यासाठी अनेक हिंदूंना प्राणांची आहुतीही द्यावी लागली होती. अनेक शतकांपासून परकीय आक्रमकांनी भारतभूमीवर केलेल्या आक्रमणांमुळे हिंदूंच्या धार्मिक, सांस्कृृतिक आणि राष्ट्रीय अस्मितांवर झालेल्या जखमा श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेमुळे अंशतः तरी भरून येतील. श्रीराममंदिराच्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्वच श्रीरामभक्तांप्रती कोटीशः कृतज्ञता !
धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य सफल होण्यासाठी स्थुलातील घटकांच्या जोडीलाच सूक्ष्मातील घटकही आवश्यक !
‘समस्त हिंदूंच्या हृदयसिंहासनी असलेले रामलला आता मंदिरात विराजमान होणार’, ही हिंदूंमध्ये धर्मक्रांतीचे आणि राष्ट्रभावनेचे स्फुल्लिंग चेतवणारीच घटना आहे. हे खचितच एक महत्तम धर्मकार्य आणि राष्ट्रकार्यच आहे. कोणतेही धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य सफल होण्यासाठी स्थुलातील घटकांच्या जोडीलाच सूक्ष्मातील घटकही आवश्यक असतात. प्रभु श्रीरामचंद्राने रावणवध करून धर्मसंस्थापना केली. श्रीरामाचे युद्धकौशल्य आणि अतुल पराक्रम या स्थूल घटकांच्या जोडीलाच त्याला गुरु वसिष्ठ अन् विश्वामित्र यांचे आशीर्वादही लाभले होते. अयोध्येत श्रीराममंदिराच्या उभारणीत वेळोवेळी आलेल्या जीवघेण्या संकटांवर मात करून अत्यंत धीरोदात्तपणे आणि चिकाटीने हिंदूंनी स्थुलातून दिलेला लढा मोलाचाच आहे; पण त्याचसह हा लढा यशस्वी होण्यासाठी अनेक संतांच्या कृपेचे लाभलेले पाठबळ, अनेक रामभक्तांनी केलेली धार्मिक अनुष्ठाने आणि उपासना याही महत्त्वाच्या आहेत.
‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय !
श्रीराममंदिर स्थापन होत असले, तरी जिहादी आतंकवाद, नक्षलवाद, धर्मांधांकडून हिंदूंच्या होणार्या हत्या, जात्यंधता इत्यादी हिंदूंना भेडसावणार्या अनेक समस्या अजूनही तशाच आहेत. हिंदूंच्या देवतांचा अवमान होत आहे आणि मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. श्रीराममंदिरावर पुन्हा आक्रमण करण्याच्या आणि तेथे पुन्हा बाबरी मशीद बांधण्याच्या धमक्या दिल्या जात आहेतच ! अशा वेळी मंदिरांचे रक्षणही झाले पाहिजे. प्रभु श्रीरामाने अश्वमेध यज्ञ करून संपूर्ण पृथ्वीवर रामराज्य, अर्थात् आदर्श असे धर्मराज्य स्थापन केले होते. हे राज्य सर्वदृष्ट्या आदर्श आणि सर्व संकटांपासून मुक्त होते. असेच धर्मराज्य, अर्थात् हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे ध्येय आज सर्व हिंदू, संप्रदाय, साधक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी ठेवले पाहिजे; कारण केवळ ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे ! हे हिंदु राष्ट्र पुढे रामराज्याच्या दिशेने मार्गक्रमण करील आणि पुढील काही दशकांमध्ये प्रत्यक्ष रामराज्य येईल.
हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी हिंदूंनी धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक !
रामराज्यातील प्रजा धर्मपालक होती; म्हणूनच तिला श्रीरामासारखा धर्मपालक राजा मिळाला आणि सात्त्विक असे रामराज्य स्थापन झाले. आपल्यालाही हिंदु राष्ट्र स्थापन करायचे असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. आज निधर्मी शासनव्यवस्थेमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नाही. त्यामुळे आता केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर प्रत्येकच मंदिर धर्मशिक्षणाचे केंद्र बनले पाहिजे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यामुळे धर्मसंस्थापना अन् हिंदु राष्ट्र-स्थापना ही कार्ये साध्य होतील !
‘जीवनाडीपट्टी’ हे महर्षींनी लिहून ठेवलेले एक प्रगल्भ ज्योतिषशास्त्र आहे. जीवनाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून महर्षी सनातन संस्थेला मार्गदर्शन करतात. नाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून महर्षींनी सांगितल्याप्रमाणे ‘सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (गुरुदेव) हे या कलियुगात श्रीरामाचा अंशावतार आहेत आणि त्यांच्यामुळे धर्मसंस्थापना अन् हिंदु राष्ट्र-स्थापना ही कार्ये साध्य होणार आहेत.’ (संदर्भ : सप्तर्षी नाडीपट्टीवाचन क्रमांक १७०, १३.२.२०२१) आज अनेक हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचाही सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी हाच पवित्र भाव असून ते करत असलेल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याचे प्रेरणास्रोत त्यांना गुरुदेवच वाटतात.
हिंदूंनो, गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून ‘समष्टी साधना’ म्हणून हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !
आपणही केवळ श्रीराममंदिर उभारून न थांबता हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातही सहभागी झालो, तरच त्यातून आपली समष्टी साधना होणार आहे. समष्टी साधनेमुळे आपल्यावर श्रीरामाची अधिकाधिक कृपा होणार आहे. यासाठी हिंदूंनो, चला… सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांप्रती दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी दिशादर्शन केलेल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या पथावरून वाटचाल करत राहूया आणि हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय साध्य करूया !’
– (पू.) संदीप आळशी (५.१.२०२४)