वॉशिंग्टन (अमेरिका) – इराण आणि पाकिस्तान या देशांमधील संघर्षाकडे अमेरिका लक्ष ठेवून आहे. दक्षिण आणि मध्य आशियात तणाव वाढू नये, अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही पाकिस्तानी अधिकार्यांच्या संपर्कात आहोत. इराणने पाकिस्तानवर केलेल्या आक्रमणातून हे दिसून येते की, तो या भागात अस्थिरता वाढवण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे.
संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनीही दोन्ही देशांकडून होणार्या हवाई आक्रमणांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, आम्ही दोन्ही बाजूंना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन करतो.
चीनची मध्यस्थी करण्याची सिद्धता !
चीनने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याची सिद्धता दर्शवली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, आम्हाला आशा आहे की, दोन्ही देश या समस्येचे निराकरण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्यांना हवे असल्यास आम्ही यासाठी पुढाकार घ्यायला सिद्ध आहोत. दोन्ही देशांमधील तणाव संयुक्त राष्ट्रांच्या ठराव आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आधारे सोडवला जावा.