जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचे ३ लाख ५३ सहस्र कोटींचे सामंजस्य करार !

जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मध्यभागी)

मुंबई – स्वित्झर्लंडमधील दावोस येथे चालू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत २ दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख ५३ सहस्र ६७५ लाख कोटी रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केले आहेत. या व्यतिरिक्त १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योजकांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदार यांचा विश्‍वास वाढला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमांद्वारे दिली आहे.

१. या करारांमुळे राज्यात पोलाद, आयटी, हरित उर्जा, कृषी, लॉजिस्टिक,  इलेक्ट्रॉनिक्स आदी क्षेत्रांत मोठी गुंतवणूक होणार असून २ लाख तरुणांसाठी रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे.

२. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदाचे करार अधिक आहेत. उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि ‘झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य’ अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात होत आहे, असे शिंदे यांनी या संदर्भात सांगितले.

३. दावोस येथील महाराष्ट्र दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध उद्योग समुहांचे प्रमुख भेटले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या करारांच्या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत हेही मुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.