Pakistan Airstrike Iran : पाकिस्तानकडून इराणमध्ये प्रत्युत्तरादाखल आक्रमण !

बलुच लिबरेशन आर्मीचे ७ तळ उद्ध्वस्त !  

इस्लामाबाद (पाकिस्तान) /तेहरान (इराण) – इराणने पाकिस्तानच्या बलुचिस्तानममधील ‘जैश अल-अदल’ या आतंकवादी संघटनेच्या २ तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांद्वारे केलेल्या आक्रमणाचा सूड घेण्यासाठी पाकिस्ताननेही इराणमधील बलुच लिबरेशन आर्मी या संघटनेच्या तळांवर हवाई आक्रमण केले. इराणमधील सारवाना भागात या संघटनेच्या ७ तळांवर हे आक्रमण करण्यात आले. पाकने या आक्रमणाची अधिकृत माहिती दिलेली नाही. इराणच्या आक्रमणानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अमीर अब्दुल्लाहियान यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री जलील अब्बास जिलानी यांच्याशी दूरभाषवरून चर्चा केली होती. विशेष म्हणजे इराणने जेव्हा पाकवर आक्रमण केले, तेव्हा भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर इराणच्या दौर्‍यावर होते. पाकवरील आक्रमणानंतर पाकने त्याच्या देशातील इराणच्या राजदूतांची हकालपट्टी करत इराणमधील स्वतःच्या राजदूतांना माघारी बोलावले होते.

‘जैश अल-अदल’ ही आतंकवादी संघटना पाक समर्थित असून ती इराणमध्ये कारवाया करत असते, तर बलुच लिबरेशन आर्मी ही बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे. ती पाकमध्ये पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण करत असते.

भारताचे इराणला अप्रत्यक्ष समर्थन !

पाक आणि इराण यांच्यातील या तणावावरून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, कोणत्याही देशाने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कारवाई केली, तर भारताला त्याची परिस्थिती समजू शकते. हे सूत्र पाकिस्तान आणि इराण यांच्यामधील आहे. याविषयी आमचे मत कुणी विचारले, तर आम्ही अनेकदा स्पष्ट केले आहे की, आतंकवादाच्या संदर्भात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

अमेरिकेची इराणवर टीका

अमेरिकेने इराणच्या आक्रमणाला चुकीचे ठरवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, इराणने अलीकडच्या काही दिवसांत त्याच्या ३ शेजारी देशांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे.

तणाव वाढवू नका ! – चीन

पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांनी तणाव वाढवू नये; कारण त्यामुळे दोन्ही देशांचीच हानी होते, असा सल्ला चीनने या दोन्ही देशांना दिला आहे. (इतरांना अशा प्रकारचे ‘ज्ञान’ देणार्‍या चीनला स्वतः असे वागायला हवे, हे मात्र समजत नाही, असे कसे म्हणता येईल ? – संपादक)