बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन

प.पू. कलावतीआई

‘संसार हा समुद्राप्रमाणे आहे. समुद्राला जशी भरती आणि ओहोटी असते, तद्वत् संसारातही सारखी सुख-दुःखे असायचीच; म्हणून कितीही बिकट परिस्थिती प्राप्त झाली, तरी धैर्य खचू न देता मनुष्याने हरिस्मरणी रत रहावे.’

– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण ‘संसाराची नश्वरता’, सुवचन क्र. ९)

२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन

पू. किरण फाटक

२ अ. संकटकाळी भक्तांनी आर्त हाक मारल्यावर देव भक्तांच्या मदतीला धावून येतो !

सुख-दुःखांच्या लाटांवरती, होतो मी वर खाली ।
भवसागरी या बुडेन देवा, मजला सांभाळी ।।

देही शक्ती नाही उरली, मनी भीती दाटली ।
धावत येई देवा आता, सहनशक्ती संपली ।।

जेव्हा आपण देवाला अशी आर्त स्वरांनी प्रार्थना करतो, तेव्हा देवही आपल्या वचनाला जागतो. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

सदा सर्वदा देव सन्नीध आहे ।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

सुखानंद आनंद कैवल्यदानी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।। – मनाचे श्लोक, श्लोक ३६

अर्थ : देव सदा सर्वकाळ भक्ताच्या जवळच असतो. तो अत्यंत कृपाळूपणे भक्ताच्या धारिष्ट्याची (धैर्याची) परीक्षा पहातो. तो सुख, आनंद, तसेच मोक्ष प्रदान करणारा आहे. देव आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही.

देव सदा सर्वदा आपल्या पुढे-मागे, तसेच आजूबाजूला असतो. ‘आपण आपल्या प्रारब्धाचा सामना कसा करतो ?’, हे तो कृपाळूपणे बघत असतो. जेव्हा भक्तांवर संकटे कोसळतात, तेव्हा जर भक्तांनी अत्यंत श्रद्धेने देवाची आळवणी केली, तर देव नक्कीच त्या भक्तांच्या मदतीला धावून जातो. भक्तांवर प्रारब्धामुळे आलेल्या संकटांना धारिष्ट्याने सामोरे जाण्यासाठी देव त्यांना सहनशक्तीचे वरदान देत रहातो.

२ आ. सुख-दुःख आणि सुख-दुःखाच्या चक्रातून सुटण्याचा मार्ग !

सुखस्यानन्तरं दुःखं दुःखस्यानन्तरं सुखम् ।
न नित्यं लभते दुःखं न नित्यं लभते सुखम् ।। – महाभारत, पर्व १२, अध्याय २६, श्लोक २३

१. सुख किंवा दुःख हे कायम रहात नाहीत. सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख येत रहाते. आपल्या जीवनात सुख-दुःखाचे हे चक्र अव्याहतपणे चालू रहाते.

२. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘न होता मनासारिखे दुःख मोठे ।’ (मनाचे श्लोक, श्लोक ९), म्हणजे ‘मनुष्याच्या मनासारखे झाले नाही, तर त्याला पुष्कळ दुःख होते.’ ते पुढे म्हणतात, ‘सुख सुख म्हणतां हे दुःख ठाकोनि आलें ।’ (करुणाष्टक, श्लोक १३), म्हणजे ‘माणूस सुखाच्या प्रतीक्षेत असतांना त्याला अकस्मात् दुःखाला सामोरे जावे लागते.’

३. मनासारखे झाले की, माणसाला सुख वाटते; पण हे सुख कायम टिकणारे नसते. सुखामागून दुःख येतच असते. ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनालासुद्धा सुख आणि दुःख, अशा दोन बाजू असतात. या सुख-दुःखाच्या चक्रात सापडून जो शाबूत रहातो, तो खरा माणूस ! ‘सुख-दुःखाच्या चक्रातून जो सुटला आणि हरिचरणी लागला, हरिभजनात रंगला, तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून आपली सुटका करून घेतो’, असे सर्व संत अन् सत्पुरुष सांगतात.

४. सुख असो वा दुःख, मनाच्या या दोन्ही अवस्थांना जो अतिशय धैर्याने सामोरे जातो आणि त्यांचा सामना करून आपल्या मनाची शांतता कायम राखतो, तो जीवनात यशस्वी होतो.

२ इ. सहनशील माणसे सुख-दुःखाचा धैर्याने सामना करू शकतात ! : शारीरिक आणि मानसिक यातना, वेदना यांनी माणूस बेजार होतो. संयम आणि संतुलित विचार ठेवल्याने माणूस मनाची शांतता ठेवू शकतो. काही माणसांत सहनशक्ती अल्प असते, तर काही माणसांत पुष्कळ असते. ज्यांच्यात सहनशक्ती भरपूर असते, ती माणसे एकही शब्द न उच्चारता सर्वकाही सहन करत रहातात; परंतु ज्या माणसात सहनशक्ती अल्प असते, ती माणसे जीवनातील दुःखांचा धैर्याने सामना करू शकत नाहीत आणि ती माणसे एखाद्या वृक्षाप्रमाणे उन्मळून पडतात.

२ ई. जीवनसंग्रामात कोण यशस्वी होतो ? : श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे,

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ३८

अर्थ : सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय समान मानून युद्धाला तयार हो. अशा रितीने युद्ध केलेस, तर तुला पाप लागणार नाही.

‘सुख-दुःख, लाभ-हानी आणि जय-पराजय यांना समान मानून जो आपले आचरण ठेवतो, तो या जीवनसंग्रामात यशस्वी होतो’, असे श्रीकृष्ण सांगतात.

२ उ. सुख-दुःखाच्या पलीकडे गेलेले संत शिरोमणी तुकाराम महाराज ! : संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज हे नेहमी विठ्ठलाच्या नामस्मरणात आणि भजन-कीर्तनात रममाण झालेले असायचे. त्यामुळे त्यांना सुख-दुःख हे समान होते. ते सुख-दुःखाच्या पलीकडे गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेली अमूल्य भेटसुद्धा त्यांनी विनम्रपणे नाकारली. त्यांना कसलीच आसक्ती राहिली नव्हती.

२ ऊ. संसारतापातून मुक्त करण्यासाठी संत तुकाराम महाराज यांनी पांडुरंगाची केलेली आर्त आळवणी ! : संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात,

संसाराच्या तापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ।।

म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ।।

बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ।।

वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ।।

बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ।।

तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ।। – तुकाराम गाथा, अभंग ९१

अर्थ : संत तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात, ‘मी या संसारात आपल्या कुटुंबाची सेवा करता करता पुष्कळ कष्ट भोगले. संसाराच्या तापात मी तापलो आहे, होरपळून निघालो आहे. आता मी अतिशय दुःखी आहे आणि मला तुझ्याच दयाळू चरणांची आठवण येत आहे. तू माझी माय आहेस. कृपा करून तू लेकराचे दुःख बघून ये. कित्येक जन्मांपासून माझे आयुष्य असेच दुःखाचे आणि कष्टाचेच आहे. कुटुंबाचा भार वहातच कित्येक जन्म गेले. ‘यातून कसे सुटावे ?’, याची कल्पना मला नाही. मला बाहेरून, तसेच मनालाही चोरांनी (दुःखांनी आणि दुर्गुणांनी) वेढले आहे अन् कुणालाही माझी करुणा येत नाही. मी पुष्कळ वणवण फिरलो. लोकांमध्ये माझा पुष्कळ पाणउतारा झाला आहे. पुष्कळ दिवसांपासून मी असाच कासावीस आहे. तुझ्या ‘दीनानाथ’ या नावाचे ब्रीद आता तू खरे कर आणि माझ्यासाठी धावून ये.

‘बहुतां जन्मींचा जालों भारवाही ।’, म्हणजे ‘गेल्या जन्मी केलेल्या असंख्य पाप-पुण्यांच्या कर्मांची फळे मी या जन्मात भोगत आहे.’ यांमध्ये चांगल्या कर्माचे फळ म्हणून मला सुख मिळते आणि मी जी वाईट कर्मे केली, त्यांचे फळ दुःखात रूपांतरित होऊन ते मला मिळते. ‘संसाराच्या तापे तापलो मी देवा ।’, असेही संत तुकाराम म्हणतात.

२ ए. माणसाला प्राप्त होणारे सुख-दुःख हे गेल्या काही जन्मांचे देणे-घेणे असते; परंतु हे व्यवहार करत असतांना माणसाने ईश्वराला विसरू नये ! : माणूस या संसारामध्ये आल्यानंतर त्याच्या भोवती असलेल्या परिस्थितीनुरूप समाजामध्ये रहात असतो. समाजातील अनेक रूढी आणि परंपरा यांचे तो पालन करत असतो. किंबहुना तसे त्याला करावे लागते आणि हे करत असतांना बर्‍याच गोष्टी त्याच्या मनाविरुद्ध घडत असतात अन् त्यांतून त्याला दुःख प्राप्त होत असते; परंतु ‘हे सर्व सुख-दुःख गेल्या अनेक जन्मांचे देणे-घेणे असते’, हे त्याच्या लक्षात येत नाही. आपले आई-वडील आपल्याला आयुष्यभर पुरतातच, असे नाही. काही भाग्यवान लोकांचे आई-वडील त्यांच्या साठाव्या वर्षापर्यंतसुद्धा पुरतात. ते त्यांच्या उपयोगी पडत रहातात. हे सर्व गेल्या जन्मीचे देणे-घेणे असते. ते आपण या जन्मी फेडत असतो. आपण ज्यांना दिलेले असते, ते लोक आपल्या जीवनात परतफेड करण्यासाठी येतात. आपण ज्यांच्याकडून घेतलेले असते, त्यांना आपण कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते गेल्या जन्मीचे घेतलेले परत करत असतो; परंतु या देण्या-घेण्याच्या गडबडीत आपण देवाला विसरता कामा नये. देव म्हणजे सर्व चराचरांना व्यापून राहिलेली एक वैश्विक शक्ती आहे, ज्या शक्तीमुळे हे पूर्ण ब्रह्मांड जिवंत आहे. त्या वैश्विक शक्तीला आपण नेहमी शरण गेले पाहिजे आणि ‘आम्हाला या जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त करा’, अशी प्रार्थना केली पाहिजे.

‘हे देवा, ‘या भवसागरात सुख-दुःखाच्या उसळणार्‍या लाटांवर आरूढ होण्यासाठी आम्हाला बळ दे. आमच्या मनाची शांती नेहमीच अढळ राहू दे’, अशी प्रार्थना आपण देवाला केली, तर देवही आपल्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन आपल्या मनाची शांती कायम ठेवील’, हाच संदेश प.पू. कलावतीआई आपल्या वरील वचनात देतात.’

– (पू.) किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (८.९.२०२३)