Ayodhya Rammandir Pranpratishtha : २२ जानेवारीला दुपारी १२.२० ते १ या वेळेत होणार प्राणप्रतिष्ठा !

१८ जानेवारीला श्री रामललाची मूर्ती मंदिरात बसवणार !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील मंदिर निर्माण कार्यशाळेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेविषयीच्या कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली. २२ जानेवारीला दुपारी १२ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी १ पर्यंत प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांची भाषणे होणार आहेत. मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती गर्भगृहात बसवण्यात येणार आहे, असेही राय यांनी सांगितले.

श्री. चंपत राय यांनी दिलेली माहिती !

१. प्राणप्रतिष्ठेची वेळ काशीचे महान विद्वान गणेश्‍वर शास्त्री द्रविड यांनी ठरवली आहे. वाराणसीचे महंत लक्ष्मीकांत दीक्षित प्राणप्रतिष्ठेचा विधी करणार आहेत.

२. कार्यक्रमाच्या सिद्धतेमुळे २० आणि २१ जानेवारीला सध्या तात्पुरत्या स्थितीत असलेल्या मंदिरातील श्री रामललाचे दर्शन बंद करण्यात येणार आहे. उद्या १६ जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेचा विधी प्रारंभ होणार असून तो २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यापूर्वी मूर्तीचे पूजन जल वास, अन्न वास, शैय्या वास, औषधी वास आणि फल वास असे केले जाईल. या सर्व पूजेसाठी १२१ आचार्य असणार आहेत.

३. पूजेच्या वेळी देशातील सर्व प्रकारची वाद्ये वाजवली जातील. यात बासुरी, ढोलक, तंबोरा, बिहारमधील पखवाज, शहनाई, रावणहत्ता आदी वाद्यांचा समावेश आहे.

४.  गर्भगृहात स्थापन करण्यात येणार्‍या श्री रामललाच्या मूर्तीचे वजन १५० ते २००  किलो आहे. रामललाची उभी मूर्ती १८ जानेवारीला गर्भगृहात बसवण्यात येईल.

५. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी अयोध्येत पोचले आहे. रामललाला सर्व जलांनी अभिषेक केला जाईल. नेपाळमधील श्रीरामाच्या सासरकडून आणि छत्तीसगडमधील त्यांच्या आजोळहून भेटवस्तू आल्या आहेत.

६. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पंतप्रधान मोदी, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास गर्भगृहात उपस्थित रहाणार आहेत.

७. निमंत्रितांमध्ये संत, धर्मगुरु, देशातील प्रमुख पोलीस अधिकारी, निमलष्करी दलाचे अधिकारी, साहित्यिक, पद्म पुरस्कार विजेते यांचा समावेश असेल. मंदिर बांधणार्‍या एल्. अँड टी., टाटा या आस्थापनांचे १०० हून अधिक अभियंते आणि कर्मचारी, याव्यतिरिक्त शैव, वैष्णव, शीख, बौद्ध, जैन, कबीर पंथी, इस्कॉन, भारत सेवाश्रम संघ, रामकृष्ण मिशन, गायत्री परिवार, राधास्वामी, गुजरातचे स्वामी नारायण, लिंगायत आदी संप्रदायांचे प्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.

८. २२ जानेवारीला संध्याकाळी देशातील नागरिकांनी त्यांच्या घरांमध्ये किमान ५ दिवे लावावेत.