श्रीरामभक्त बद्री विश्‍वकर्मा स्वत:च्या जटांनी रामरथ ओढून २२ जानेवारीला अयोध्येत पोचणार !

श्रीराममंदिर पूर्ण झाल्यावर असे करण्याचा वर्ष १९९२ मध्ये घेतला होता संकल्प !

दमोह (मध्यप्रदेश) – श्रीराममंदिराचे उद्घाटन आता एका आठवड्यावर आले आहे. हा सुवर्णक्षण जसा जवळ येत आहे, तसे भारतभरातील रामभक्तांच्या प्रभु श्रीरामासाठी घेतलेल्या प्रतिज्ञा जगासमोर येत आहेत. येथील बद्री विश्‍वकर्मा हे अशांपैकीच एक होत. त्यांनी वर्ष १९९२ मध्ये म्हणजे आतापासून ३२ वर्षांपूर्वीच संकल्प केला होता की, जेव्हा राममंदिर उभारले जाईल, तेव्हा ते पायी चालत रामाचा रथ स्वत:च्या जटांनी ओढून अयोध्येत पोचतील. त्यांची इच्छा पूर्ण होत असल्याने ते ११ जानेवारी या दिवशी दमोह जिल्ह्यातील बटियागड येथून रामरथ ओढून पायी निघाले आहेत.

१. १४ जानेवारी या दिवशी महोबा येथील संकटमोचन मंदिरात त्यांचे स्वागत करण्यात आले. बद्री यांनी सांगितले, ‘माझा एकूण पायी प्रवास हा ५६६ किलोमीटरचा असून प्रतिदिन ५० ते ६० किमी प्रवास करून २२ जानेवारीला अयोध्येत उपस्थित राहीन.’

२. या वेळी ते म्हणाले की, जे कुणी नाही करू शकले, ते पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी करून दाखवले. ते संत आहेत. मी त्यांना संत मानतो आणि त्यांना सर्वाधिक धन्यवाद देतो. श्रीरामभक्तांना आज जेवढे प्रेम मिळत आहे, ते याआधी कधीच मिळाले नाही.

३. बद्री छतरपूर जिल्ह्यात पोचल्यावर तेथील बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा आशीर्वादही घेणार आहेत.