लक्षद्वीपचे खासदार महंमद फैजल यांचा दावा !
नवी देहली – लक्षद्वीप बेट मोठ्या संख्येने पर्यटकांचा भार सहन करू शकत नाही. येथील हॉटेल्समध्ये केवळ १५० खोल्या आहेत आणि येथे ये-जा करण्यासाठी विमानांची उड्डाणेही अल्प आहेत. या दोन्हींमध्ये वाढ झाली, तरीही पर्यटक मोठ्या संख्येने येथे येऊ शकत नाहीत; कारण येथील नैसर्गिक वातावरण अतिशय संवेदनशील आहे आणि ते पर्यटक सहन करू शकणार नाही, अशी माहिती लक्षद्वीपचे खासदार महंमद फैजल यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीला सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भारतियांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी जाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मालदीवने यावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार फैजल बोलत होते.
महंमद फैजल पुढे म्हणाले की, आम्ही ‘इंटिग्रेटेड आयलँड मॅनेजमेंट प्लॅन’च्या आधारेच येथे विकास करत आहोत. हीच योजना न्यायमूर्ती रवींद्रम् आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आली होती. लक्षद्वीपच्या विकासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. आयोगाच्या सल्ल्यानुसार लक्षद्वीपमध्ये अधिक पर्यटक अचानक यावेत, असे आम्हाला वाटत नाही. अल्प पर्यटकांच्या साहाय्याने महसूल मिळवण्यावर आमचा भर आहे. येथे येऊ इच्छिणार्यांना ‘येथील पर्यावरणाची हानी होणार नाही’, याची काळजी घ्यावी लागेल.