सिंधुदुर्ग : मार्गावर सुरक्षारक्षक न नेमल्यास खनिज वाहतूक रोखणार ! – हेमंत मराठे, उपसरपंच, मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत

श्री. हेमंत मराठे, उपसरपंच, मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत

सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे येथील धोकादायक आणि रहदारीच्या ठिकाणी सुरक्षारक्षक न नेमल्यास या मार्गावरून होणारी खनिज वाहतूक रोखणार, अशी चेतावणी  मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली आहे.

कळणे-मळेवाड-रेडी आणि साटेली-मळेवाड-रेडी या मार्गांवरून खनिज वाहतूक करणारे डंपर जात असतात. वाहतूक आस्थापन आणि खनिज उत्खनन करणारे आस्थापन यांनी या मार्गावर रहदारीच्या आणि धोकादायक ठिकाणी सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. खनिज वाहतूक करतांना सुरक्षारक्षक नेमण्याच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे, तर याकडे खाण अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित आणि वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. खनिज वाहतूक चालू करण्यापूर्वी संबंधित गावांतील ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारची कल्पना दिलेली नाही. त्यामुळे खनिज आस्थापन मनाप्रमाणे वागत असल्याचे स्पष्ट होते, असे मराठे यांनी सांगितले.