Remove Kuki ST Status : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी समाजाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून बाहेर काढण्यासाठी समितीची स्थापना !

हिंदु मैतेई समाजाला या सूचीमध्ये समाविष्ट केल्याने कुकी समाजाकडून होत आहे विरोध !

प्रतिकात्मक छायाचित्र

इंफाळ (मणीपूर) – मणीपूरमधील हिंदु मैतेई समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचा तेथील ख्रिस्ती कुकी समाजाकडून विरोध केला जात आहे. यामुळे राज्यात गेले अनेक महिने हिंसाचार चालू आहे. यात १८० हून अधिक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आता राज्यातील भाजप सरकार कुकी समाजालाच अनुसूचित जमातीच्या सूचीतून बाहेर काढण्यासाठी विचार करत आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कुकी समाजाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून हटवण्यासाठी विचार करण्यास सांगितल्यानंतर राज्य सरकारने या संदर्भात समिती स्थापन केली. याविषयी राज्याचे मुख्यमंत्री एन्. बीरेन सिंह यांनी सांगितले की, राज्यातील अनुसूचित जमातीच्या सूचीतून कुकी समाजाला बाहेर काढण्याच्या प्रस्तावावर ही समिती निर्णय घेईल.

१. मुळात राज्यघटनेनुसार हिंदूंना जातीवर आधारित आरक्षण दिले जाते. असे असतांना ख्रिस्ती कुकींना आरक्षण कसे दिले गेले, याची चौकशी या समितीकडून करण्यात येईल, असे सांगितले जात आहे.

२. जर या समितीने कुकी समाजाला अनुसूचित जमातीच्या सूचीतून बाहेर काढण्याची शिफारस केली, तर केंद्र सरकारला यावर विचार करावा लागेल. केंद्र सरकारने याला संमती दिल्यानंतरच कुकी समाजाला या सूचीतून बाहेर काढण्यात येईल. जर समितीने कुकी समाजाला सूचीमध्ये ठेवण्यास सांगितले, तर केंद्र सरकार त्यावरही निर्णय घेईल.

३. मणीपूरच्या लोकसंख्येमध्ये ५३ टक्के हिंदु मैतेई समाज आणि ४० टक्के नागा अन् कुकी समाज आहे.