देशात गेल्या २० वर्षांत किरणोत्सर्गी उपकरणांची होत आहे चोरी !

आतंकवाद्यांकडे उपकरणे पोचल्यास मोठा धोका !

नवी देहली – देशात गेल्या २० वर्षांपासून किरणोत्सर्ग करणार्‍या उपकरणांची सातत्याने चोरी होत आहे. ही उपकरणे रुग्णालये, खाणी, संशोधन संस्था आदी ठिकाणी वापरण्यात येत असतांना त्यांची चोरी झालेली आहे. ही उपकरणे जिहादी आतंकवाद्यांच्या हातात गेल्यास मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या २० वर्षांत किरणोत्सर्गी उपकरणे कुणी चोरली आणि कुणी विकत घेतली ? यासंदर्भात अन्वेषण यंत्रणांना अद्याप काहीही कळू शकलेले नाही. कोणत्या आतंकवादी गटाने ती विकत घेतली कि नाही ? हेही समजू शकलेले नाही. दुसरीकडे ही उपकरणे विकत घेण्यात भंगार विक्रेत्यांना रस असल्याचीही माहिती मिळाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांना भंगार बाजारात उपकरणे पोचल्याची माहितीही मिळाली; परंतु तेथे झडती घेतली असता उपकरणे सापडली नाहीत. आतंकवादी संघटना केवळ भारतातील गुन्हेगार आणि भंगार विक्रेत्यांकडूनच किरणोत्सर्गी उपकरणे मिळवू शकत नाहीत, तर बाहेरील देशांतूनही आणू शकतात.

१. तज्ञांच्या मते, आतंकवादी गट सहजपणे आर्.ई.डी. (रेडिओलॉजिकल एक्सपोजर डिव्हाइस) किंवा आर्.डी.डी. (रेडिओलॉजिकल डिस्पर्सल डिव्हाइस) बनवू शकतात. आर्.ई.डी. सार्वजनिक ठिकाणी किरणोत्सर्ग पसरवू शकते. दुसरीकड आर्.डी.डी. किरणोत्सर्गी सामग्रीसह ‘डायनामाइट’सारख्या स्फोटकांना जोडतो. त्याला ‘डर्टी बॉम्ब’ म्हणतात. जेव्हा डायनामाईटचा स्फोट होतो, तेव्हा किरणोत्सर्गी सामग्री मोठ्या क्षेत्रावर पसरते. यातून मोठा अनर्थ होऊ शकतो.

२. ‘सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज’चे तज्ञ डॉ. मनप्रीत सेठी यांनी सांगितले की, भारताचे अणुबाँब आतंकवाद्यांच्या हाती पडू शकत नाहीत; कारण त्यांची सुरक्षा अनेक स्तरीय आहे. त्यांचे नियंत्रणही एकाच ठिकाणी नाही; पण किरणोसर्गी उपकरणे जोडून ‘डर्टी बाँब’ बनवता येतात. सुरक्षा यंत्रणांसाठी ही काळजीची गोष्ट आहे.

३. भारत सरकारची वर्ष २०१२ ते २०२२ या १० वर्षांत अटारी सीमेवरच किरणोत्सर्ग शोधणारी उपकरणे बसवण्यात आली आहेत. याखेरीज बंदरांवरही उपकरणे बसवली आहेत.