उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा मिरज (सांगली) येथील कु. अवधूत जगताप (वय १० वर्षे) !

(‘वर्ष २०२० मध्ये कु. अवधूत जगताप याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के होती आणि आता वर्ष २०२३ मध्येही त्याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.’ – संकलक)

कु. अवधूत जगताप

१. अवधूतमध्ये असलेले गुण  

१ अ. बुद्धीची प्रगल्भता : ‘अवधूत प्रत्येक कृती करतांना अभ्यासपूर्ण आणि नीटनेटकी करतो. तो प्रत्येक कामातील बारकावे सहजपणे सांगतो. तो शाळेतील उपक्रम फार सुंदर करतो.

१ आ. साहाय्य करणे : तो मला घरकामांत साहाय्य करतो. त्याने स्वच्छता केल्यानंतर घरातील वातावरण प्रसन्न आणि उत्साही वाटते.

१ इ. सर्वांना आपलेसे करून घेणे : आम्ही रहात असलेल्या वसाहतीतील सर्व मुलांना अवधूतचा पुष्कळ लळा आहे. तो सर्वांना हवाहवासा वाटतो. अवधूत सर्वांना आपलेसे करून घेतो. त्याच्यातील दैवी चैतन्यामुळे तो सर्वांचा आवडता आहे.

१ ई. वर्गशिक्षिकेने अवधूतचे केलेले कौतुक ! : मार्च २०२३ मध्ये मी अवधूतच्या शाळेत गेले होते. त्या वेळी मी त्याच्या वर्गशिक्षिकेला भेटले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘अवधूत वर्गात पुष्कळ शांत असतो. २ वर्षांपासून तो माझ्याकडे शिकत आहे. शाळेतील इतर मुले पुष्कळ दंगा करतात. त्यांना पुष्कळ सांगावे लागते; परंतु अवधूतचा मला कसलाच त्रास नाही. तो माझा आवडता विद्यार्थी आहे. तो पुष्कळ बुद्धीमान आहे. त्याच्या शाळेतील वह्या पुष्कळ सुंदर असतात. त्यात कुठेही खाडाखोड केलेली नसते. अवधूतच्या वह्या मी पुढच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी जपून ठेवल्या आहेत.’’

१ उ. देवाप्रती पुष्कळ भाव असणे : अवधूत मनापासून देवपूजा करतो. तो देवतांची मांडणी आकर्षक पद्धतीने करतो. त्याला लहानपणापासून पूजा करायची आवड आहे. त्याने केलेली पूजा पाहून माझे मन उत्साही आणि आनंदी होते.

सौ. वेदिका जगताप

२. अनुभूती

२ अ. वर्ष २०१८ मध्ये संतांचा सत्संग लाभणे आणि त्यानंतर अवधूतचा त्रास अल्प होऊन त्याच्या दैवी प्रवासाला आरंभ होणे : ऑगस्ट २०१८ मध्ये आम्ही सर्वजण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथे गेल्यानंतर आम्हाला संतांचा अमूल्य सत्संग लाभला. तेव्हा अवधूत ७ वर्षांचा होता. त्या सत्संगानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र पालट झाला. त्याचे वागणे आणि बोलणे पूर्ण पालटले. रामनाथी आश्रमातून आल्यानंतर काही मासांतच मला त्याचे बोलणे दैवी असल्याचे वाटू लागले. मला त्याच्या संदर्भात काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी लक्षात आल्या. ‘संतांची दृष्टी ज्या जिवावर पडते, त्या जिवाचा उद्धार होतो. त्याचे सर्व मंगल होते. त्यांची वाणी ज्याच्या कानी पडते, त्या जिवाची आध्यात्मिक प्रगती होत असते.’ अवधूतच्या संदर्भातही असेच घडले. अवधूतला संतांचा सत्संग लाभल्यानंतर अवधूतची प्रगती आणि दैवी बोलणे यांत जलद गतीने वाढ झाली.

२ आ. औदुंबराच्या झाडाखाली बसून मानसपूजा करतांना अवधूतला दत्तगुरूंचे दर्शन होणे : आमच्या घराच्या बाहेर अंगणात औदुंबराचे पुष्कळ मोठे झाड आहे. एकदा मी आणि अवधूत दुपारच्या वेळी त्या झाडाखाली बसून श्री दत्तगुरूंची मानस पाद्यपूजा करत होतो. अवधूतने डोळे मिटल्यावर त्याला पुष्कळ तेजस्वी आणि विराट असे दत्तगुरूंचे दर्शन झाले. त्यांचे डोळे निळसर होते. ते अवधूतकडे पाहून स्मितहास्य करत होते. अवधूतने त्यांना नमस्कार केला. ही अनुभूती त्याने मला सांगितली, तेव्हा माझी भावजागृती झाली. त्या क्षणी मला सर्वत्र चैतन्य जाणवत होते आणि पुष्कळ आनंदी वाटत होते.

२ इ. अवधूतने औदुंबराच्या झाडाविषयी सांगितलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती : अवधूतने मला त्या औदुंबराच्या झाडाविषयी सांगितले, ‘‘आई, हे झाड पुष्कळ सात्त्विक आहे. या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांचे तत्त्व आहे. या बंगल्याभोवती सर्वत्र या झाडाचे चैतन्य पसरले आहे. हे झाड आपले रक्षण करत आहे. त्यामुळे येथे वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत.’’ आमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ, तसेच घराच्या चारही बाजूने औदुंबराची लहान-लहान रोपे उगवली आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांतही औदुंबराची रोपे उगवली आहेत. त्या रोपांची संख्या आता २५ ते ३० इतकी झाली आहे. अवधूत आणि मी त्या झाडाखाली बसून ‘दत्तमाला मंत्र’ म्हणायचो.

२ ई. अवधूतने आईचा आध्यात्मिक त्रास वाढल्याचे ओळखून त्यावर नामजपादी उपाय सांगणे : वर्ष २०२१ पासून मला एकाच वेळी ‘अवधूतचे निरागस आणि गोंडस रूप अन् दुसरीकडे सूक्ष्मातले जाणून घेणारी त्याची प्रगल्भ बुद्धीमत्ता’, अशी दोन्ही रूपे पहायला मिळतात.

एकदा मी आणि अवधूत अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली बसून दत्तमाला मंत्र म्हणत होतो. काही वेळाने अवधूत मला म्हणाला, ‘‘आई, तुझा त्रास वाढला आहे. तुला येथून पुढे १० दिवस सतत नामजपादी उपाय करावे लागतील, नाहीतर तुझा त्रास वाढेल.  आता अनिष्ट शक्तींचा जोर पुष्कळ आहे. त्या तुझा नामजप होऊ देणार नाहीत. तुझा त्रास पुष्कळ वाढवतील; पण तू पुष्कळ प्रयत्नपूर्वक नामजप कर. हळूहळू तुझा त्रास न्यून होईल. काळजी करू नकोस. मी तुला नामजप सांगतो.’’ त्या वेळी माझा आध्यात्मिक त्रास खरोखरंच वाढला होता. देवानेच त्याच्या माध्यमातून मला त्याची जाणीव करून दिली. त्या वेळी अवधूत ९ वर्षांचा होता.

३. ‘देवाला कसे केलेले आवडेल ?’ याचा अभ्यास करून दत्तजयंतीच्या दिवशी पूजेची सिद्धता भावपूर्ण आणि परिपूर्ण करणे : डिसेंबर २०२२ मध्ये दत्तजयंतीच्या दिवशी अवधूतने सकाळी लवकर उठून पूजेची सर्व सिद्धता भावपूर्ण केली. औदुंबराच्या झाडाखाली सडा घातला. सर्व पायर्‍यांवर रांगोळी काढली. पूजेची सर्व सिद्धता त्याने एकट्याने केली. त्याने केलेली आरास पाहून मला पुष्कळ उत्साही आणि प्रसन्न वाटत होते. त्याने भावपूर्ण केलेली पुष्परचना पाहून माझी भावजागृती झाली. अवधूतमध्ये जन्मतःच देवाप्रती ओढ आहे. ‘देवाला कसे केलेले आवडेल ?’ याचा तो अभ्यास करतो. त्याच्यामध्ये प्रगल्भ विचार, व्यापक दृष्टीकोन आणि देवाकडून मिळालेले ज्ञान, या तिन्ही दैवी गुणांचा संगम आहे.

४. अवधूतच्या सहवासात चैतन्य मिळत असल्याचे जाणवणे

अ. अवधूत माझ्याजवळ झोपला की, चैतन्य मिळते. काही वेळा तो मला चिकटून झोपला, तर मला त्याचा राग येतो. त्याला दूर ढकलून द्यावेसे वाटते. तेव्हा ‘मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींना त्याच्यातील चैतन्याचा त्रास होत आहे’, असे मला जाणवते.

आ. कधी कधी मी अवधूतवर विनाकारण ओरडते. त्याच्या सहवासात माझी चिडचिड होते. त्या वेळी ‘माझा आध्यात्मिक त्रास बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते.’

– सौ. वेदिका संजय जगताप (कु. अवधूतची आई), मिरज, जिल्हा सांगली. (२८.६.२०२३)

सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अवधूत संजय जगताप (वय १० वर्षे) !

‘माझी मुलगी चि. अनुश्री (वर्ष २०२१ मध्ये अनुश्रीची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के होती.’- संकलक) हिचा जन्म ३०.८.२०२० या दिवशी झाला. ती गर्भात असतांना मला झालेले आध्यात्मिक त्रास अवधूतला न सांगताही समजत असत. त्या वेळी तो मला योग्य दृष्टीकोन देऊन सकारात्मक करत असे. तो बाळासाठी भावपूर्ण प्रार्थना करत असे. अवधूतने बाळाच्या जन्माआधी सांगितलेली सूत्रे प्रत्यक्षात खरी ठरत असल्याचे लक्षात आले. 

१. चि. अनुश्रीच्या जन्माआधी अवधूतने केलेल्या भावपूर्ण प्रार्थना

चि. अनुश्री जगताप

१ अ. अवधूतने अनुश्रीच्या वेळी गर्भारपणात आईच्या पोटावर हात ठेवून केलेली प्रार्थना ‘बाळाला कळत आहे’, असे जाणवणे : ‘मी अनुश्रीच्या वेळी गरोदर असतांना दत्ताचा नामजप करत असे. अवधूतही माझ्या पोटावर हात ठेवून नामजप आणि प्रार्थना करत असे. त्या वेळी बाळाची हालचाल जलद गतीने व्हायची. तेव्हा ‘अवधूतने केलेली प्रार्थना बाळाला कळत आहे’, असे मला जाणवायचे. अवधूत माझ्या पोटावर हात ठेवून पोटातील बाळाला प्रार्थना आणि नामजप सांगत असे. तेव्हा बाळही प्रतिसाद द्यायचे आणि मला पुष्कळ चांगले वाटायचे.

१ आ. अवधूतने केलेली प्रार्थना देवापर्यंत पोचल्याचे आणि बाळाच्या जन्माविषयी त्याने सांगितलेले बोल खरे ठरल्याचे लक्षात येणे : वर्ष २०२० मध्ये गणेशोत्सव चालू असतांना एकदा अवधूतने अर्ध्या रात्री उठून गणपतीला प्रार्थना केली, ‘हे गणपतिबाप्पा, माझ्या आईला लवकरात लवकर बरे वाटू दे. बाळाचा जन्म चांगल्या मुहूर्तावर होऊ दे.’ दोन दिवसांनंतर पितृपक्ष चालू होणार होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी मला पूर्ण बरे झाल्यासारखे वाटू लागले. माझा थकवा पूर्ण निघून गेला. आधुनिक वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी माझी तपासणी केली आणि म्हणाले, ‘‘सर्व काही ठीक आहे. आपण उद्या शस्त्रक्रियेद्वारे तुमची प्रसूती करूया.’’ त्या वेळी अवधूतचे बोल खरे ठरल्याचे माझ्या लक्षात आले. त्याने काही मासांपूर्वी मला सांगितले होते, ‘‘आई, तू काळजी करू नकोस, बाळ चांगल्या वेळीच जन्माला येईल.’’ त्या वेळी मला देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. गर्भारपणात माझ्या मनात मधेमधे बाळाविषयी नकारात्मक विचार यायचे; पण अवधूतशी बोलल्यानंतर माझे नकारात्मक विचार न्यून होत असत.

३. प्रसूतीच्या १५ दिवस आधी ‘कोरोना’ने रुग्णाईत होणे आणि मनात नकारात्मक विचार येऊन भीती वाटणे.

ऑगस्ट २०२० हा कोरोनाचा काळ होता. त्या वेळी मला अकस्मात थंडी, ताप आणि खोकला येऊन थकवा जाणवू लागला; म्हणून मी आधुनिक वैद्यांकडे गेले. त्यांनी मला काही औषधे लिहून दिली. ती औषधे घेऊनही मला बरे वाटले नाही; म्हणून मी पुनः त्यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्या रक्तातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे) प्रमाण न्यून झाले आहे. तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहे. तुम्ही आठ दिवस आराम करा. तुमची प्रसूती कधी करायची, ते तुमच्या प्रकृतीनुसार ठरवूया. तुम्ही आठ दिवसांनी परत या.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला भीती वाटू लागली आणि मनात विचार आला, ‘आता माझी प्रसूती पुढे गेली, तर ती पितृपक्षात होईल.’

४. अवधूतने बाळाच्या जन्माविषयी सांगितलेली सूत्रे प्रत्यक्षात खरी ठरणे

४ अ. अवधूतने जन्मणार्‍या बाळाविषयी सांगितलेली सूत्रे : अवधूतने मला सांगितले, ‘‘आई, तू काळजी करू नकोस. बाळाचा जन्म पितृपक्षाच्या आधी, चांगल्या तिथीला होईल. (प्रत्यक्षातही बाळाचा जन्म अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी झाला.) आई, तुला मुलगी होईल. तिचा जन्म एका चांगल्या कार्यासाठी होणार आहे. हे बाळ जन्मतः सात्त्विक आणि साधना करणारे आहे. बाळाची आध्यात्मिक पातळी चांगली असून बाळाचा जन्म ईश्वरी नियोजनानुसार होणार आहे. त्यामुळे तू बाळाविषयी नकारात्मक विचार करू नकोस.’’

४ आ. देवाने अवधूतच्या माध्यमातून ‘जन्मानंतर बाळ पुष्कळ रडेल, त्यासाठी नामजपादी उपाय करावे लागतील’, असे सांगून मनाची सिद्धता करून घेणे : गर्भारपणी (७ ते ८ व्या मासांत) ८ वर्षांचा अवधूत मला सांगत असे, ‘‘आई, बाळ जन्माला येईल, तेव्हा ते पुष्कळ रडेल. आईच्या पोटात बाळ असते, तेव्हा ते एका वेगळ्या जगात असते. बाळाचा जन्म होतो, त्याक्षणी त्याला बाहेरील जग नवीन असल्यामुळे ते रडते. त्याला ‘आपण कोण आहोत ? आपल्याला काय करायचे आहे ?’ हे ठाऊक नसल्यामुळे ते पहिले काही मास रडेल; पण त्या वेळी तू बाळाला मारू नकोस किंवा चिडचिड करू नकोस; कारण त्याला स्वतःची ओळख नसते. हळूहळू काही दिवसांनी त्या बाळाला ‘आपण कोण आहोत ?’, हे लक्षात येते. मग ते स्थिर होते. मग त्याचे रडणे न्यून होते. तुला नामजप आणि उपाय करावे लागतील.’’

प्रत्यक्षातही अनुश्री जन्मानंतर पुष्कळ रडत असे. रात्रंदिवस झोपत नसे. तेव्हा माझी चिडचिड होत असे. त्या वेळी मला अवधूतच्या बोलण्याचा अर्थ कळला. देवाने अवधूतच्या माध्यमातून माझ्या मनाची सिद्धता करून घेतली. अवधूतचे बोलणे ऐकून मी थक्क झाले. मला वाटायचे, ‘८ वर्षांच्या मुलाला एवढे ज्ञान आणि एवढी समज कुठून आली असेल ?’ तेव्हा ‘हे ज्ञान त्याला उपजतच आहे’, असे मला जाणवले.

५. अवधूतने आईच्या मनात बाळाविषयी पुष्कळ नकारात्मक विचार येत असल्याचे ओळखून नामजपादी उपाय वाढवण्यास सांगणे.

बाळाच्या जन्माआधी आणि नंतरही मझ्या मनात बाळाविषयी पुष्कळ नकारात्मक विचार येऊन बाळाचा राग येत असे. ते रडायला लागले की, माझी चिडचिड होत असे. ‘बाळाला कुठेतरी दूर सोडून यावे’, असे मला वाटायचे. अवधूतला हे माझे विचार समजले आणि तो मला म्हणाला, ‘‘आई, तू नामजप करत बाळाला दूध पाजलेस, तर बाळ सकारात्मक होईल. तू वाईट विचार करत असशील, तर ते विचार दुधाच्या माध्यमातून बाळापर्यंत पोचतील आणि त्याचा त्रास वाढेल. तू नामजपादी उपाय केलेस, तर बाळाला त्याचा लाभ होईल.’’

– सौ. वेदिका संजय जगताप (कु. अवधूतची आई ) मिरज, जिल्हा सांगली (२८.६.२०२३ )

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.