जोगेश्वरी (मुंबई) – येथील ‘रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती संस्थे’च्या बालविकास मंदिर या शाळेत ‘मराठीतून शिक्षण प्रगतीचे लक्षण’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पालकांना निमंत्रित करून त्यांनी त्यांच्या मुलांना मराठी माध्यमात घालण्याचा निर्णय किती अचूक आणि योग्य आहे ?, हे सांगण्यात आले. या वेळी या शाळेतून उत्तीर्ण होऊन विदेशात स्थायिक झालेल्या किंवा मोठ्या पदावर असणार्या विद्यार्थ्यांविषयी या वेळी माहिती देण्यात आली.
जपान, फ्रान्स, जर्मनी या देशांतील मुले मातृभाषेतून शिकत असल्यामुळे हे देश जगावर राज्य करतात. इंग्रजी बोलणे आणि बुद्धीमत्ता यांचा तसा संबंध नसतो. मातृभाषेतून लहान वयात शिक्षण घेतल्यामुळे मुलांचा बौद्धीक आणि आत्मिक विकास होतो, असे या वेळी संस्थेच्या चिटणीस सुरक्षा घोसाळकर यांनी सांगितले. या वेळी पालकांनाही ‘अनोळखी व्यक्तीशी बोलतांना प्रथम मराठीत आरंभ करावा’, असे आवाहन करण्यात आले.