दुसर्याने काढलेली रेष लहान न करता तिच्या शेजारी स्वतःची मोठी रेष काढून बिरबलाने मूळची रेष लहान करून दाखवल्याची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. अगदी तसाच प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘लक्षद्वीप हे एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे’, हा संदेश देऊन केला. मालदीवसारखा एका टिंबाएवढा देश चीनच्या पाठिंब्याने जेव्हा बलाढ्य भारताला डिवचतो, तेव्हा अशांना उत्तरे देऊन स्वतः लहान होण्यापेक्षा वरीलप्रमाणे लहान रेषेच्या शेजारी मोठी रेष काढण्यासारखी हुशारी दाखवावी लागते. ती पंतप्रधान मोदी यांनी दाखवली. पंतप्रधानांचा हा घाव मालदीवच्या इतका वर्मी लागला होता की, मालदीवचे सरकार समूळ हादरले. त्यानंतर तेथे आजतागायत चालू असलेली उलथापालथ आपण सर्वच जण वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून पहात आहोत. या ‘युद्धात’ एक सर्वांत जमेची बाजू दिसून आली, ती म्हणजे भारतियांनी दाखवलेली एकजूट ! पंतप्रधान आणि भारत यांचा अवमान असह्य झाल्याने क्रिकेटपटूंपासून उद्योजकांपर्यंत अन् व्यावसायिकांपासून कलाकारांपर्यंत सर्वच जण मालदीववर तुटून पडले. यात सर्वसामान्य भारतीय पर्यटकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सहस्रो पर्यटकांनी त्यांचा मालदीव दौरा तडकाफडकी रहित केला. कुठल्याही देशात युद्धाचा कालावधी सोडला, तर इतर वेळी अभावानेच अशी एकजूट पहायला मिळते.
‘इंडिया’ आघाडीचा भारतद्वेष !
एकीकडे देश एकसंध असतांना दुसरीकडे विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने मात्र देशविरोधी सूर आळवला आहे. ‘मालदीवमध्ये लागलेल्या राजकीय आगीची झळ जणू काँग्रेसला बसली आहे कि काय ?’, असे काँग्रेसच्या अध्यक्षांनी नुकत्याच केलेल्या विधानावरून वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘‘वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून ते सर्व गोष्टी वैयक्तिकरित्या घेत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या शेजार्यांशी आपल्याला चांगले संबंध ठेवले पाहिजेत. आपण आपल्या शेजारी देशांना पालटू शकत नाही.’’ या विधानावरून खर्गे यांच्यावरही टीका केली जात आहे. जेव्हा पंतप्रधान मोदी वैयक्तिकरित्या कुठल्या संतांची भेट घेतात, तेव्हा हेच काँग्रेसवाले ‘मोदी हे हिंदूंचे नाही, तर सर्व देशाचे पंतप्रधान आहेत’, असे न विसरता सांगतात. आता जेव्हा मोदींवर वैयक्तिकरित्या अत्यंत खालच्या भाषेत अश्लाघ्य टीका केली गेली, तेव्हा मात्र त्याचा निषेध करण्याऐवजी काँग्रेसवाले ‘मोदी सर्व गोष्टी वैयक्तिकरित्या घेतात’, अशी ओरड करत आहेत. हा दुटप्पीपणा नव्हे का ? पंतप्रधान हे जर संपूर्ण देशाचे असतील, तर त्यांचा अवमान वैयक्तिक कसा असू शकतो ? तो देशाचाच अवमान ठरतो. याची जाण आणि भान काँग्रेसला कधी नसते, ही शोकांतिका आहे. विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ या आघाडीतील आणखी एक नेते तथा जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनीही मोदीविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘भारत आणि मालदीव यांच्यातील ताणल्या गेलेल्या राजकीय संबंधांना भारतातील हिंदु-मुसलमान यांच्यात वाढत चाललेला द्वेष कारणीभूत आहे’, असे विधान करून अब्दुल्ला यांनी उघडपणे मालदीवची बाजू घेतली. ज्यांनी स्वतःच्या राज्यात हिंदूंचा वंशविच्छेद होऊ दिला आणि जिहादी आतंकवाद्यांना नेहमी पाठीशी घातले, त्या अब्दुल्ला यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी कशी करणार ? अयोध्येत श्रीराममंदिर उभे रहात असल्याचा जळफळाट त्यांच्या या प्रतिक्रियेवरून स्पष्ट दिसून येतो. सांगायचे तात्पर्य म्हणजे एकीकडे सर्व देश पंतप्रधान मोदी आणि भारत यांच्या बाजूने असतांना ‘इंडिया’ नावाची आघाडी मात्र भारताच्या विरोधात उभी असल्याचे चित्र दिसत आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांनी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राबवलेल्या ‘इंडिया आऊट’ मोहिमेविषयी मात्र ‘इंडिया’ आघाडी मूग गिळून गप्प आहे. भारताचा हा अवमान त्यांना स्वतःचा वाटत नाही का ? एकूणच भारताच्या अवमानाविषयी काहीही न वाटणार्या आणि उलट राजकारण करण्यात धन्यता मानणार्या ‘इंडिया’ आघाडीचा हा भारतद्वेषच म्हणावा लागेल !
चीनकडूनही भारतावर टीका !
या प्रकरणी जशी काँग्रेसने टीका केली, तशीच टीका चीननेही केली आहे. लक्षद्वीप प्रकरणानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीनच्या दौर्यावर गेले. मुइज्जू यांच्या आतापर्यंतच्या चीनधार्जिण्या आणि भारतविरोधी भूमिकेमुळे त्यांना सर्वत्र ‘चीन समर्थक’ असे संबोधले जाते. हा शब्द चीनला चांगलाच जिव्हारी लागला आहे. ‘मुइज्जू यांचा ‘चीन समर्थक’ असा उल्लेख करणे, हे काही भारतीय नेत्यांमधील आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते. चीनशी स्पर्धा करण्याच्या नादात भारताने त्याच्या शेजारी देशांशी संबंध बिघडवले. आता त्याचे खापर चीनवर फोडू नये’, अशी अर्थहीन टीका चीनने केली आहे. असे असले, तरी वस्तूस्थिती कधी लपून रहात नाही. भारताकडून झालेल्या प्रखर विरोधानंतर मुइज्जू यांनी केलेला चीनचा दौरा बरेच काही सांगून जातो. मालदीवची संपूर्ण अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारलेली असून भारतीय पर्यटक त्यांचे सर्वांत मोठे ग्राहक आहेत. भारतावरचे हे अवलंबित्व अल्प करण्याचा प्रयत्नही मुइज्जू यांनी त्यांच्या चीन दौर्यात केला. त्यांनी चिनी नागरिकांना पर्यटनासाठी मालदीवला येण्याची गळ घातली, तसेच त्यासाठी विविध सवलती देण्याची सिद्धताही दर्शवली. तरीही त्यांना ‘चीन समर्थक’ म्हटलेले चीनला खुपले आहे आणि वर तो भारतावरच टीका करत आहे. थोडक्यात काँग्रेसप्रमाणे चीनही भारतावर टीका करत आहे. दोघांचे शब्द जरी वेगळे असले, तरी सूर एकच आहे !
मालदीवमधील बहुतांश नागरिक, व्यावसायिक आदींनी भारताचा अवमान करणार्या त्यांच्या देशातील मंत्र्यांची कानउघाडणी केली असली, तरी मुइज्जू यांनी मात्र अद्यापही याविषयी चकार शब्द काढलेला नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. चीन एकामागोमाग एक भारताचे मित्र तोडत आहे. त्यामुळे जसे आपल्याला चीन आणि मालदीव यांच्यापासून सावध रहायला हवे, तसेच ‘इंडिया’ आघाडीपासूनही सावध रहायला हवे. खरे तर इंडिया आघाडीला स्वतःचे ‘इंडिया’ हे नाव सार्थकी लावायची संधी होती; कारण मालदीवविरुद्धचे हे ‘युद्ध’ असे आहे, जेथे भारतीय जनताच ‘योद्धा’ बनली आहे. अशात ‘इंडिया’ आघाडीने मालदीवच्या ‘इंडिया आऊट’च्या चळवळीत सहभागी व्हायचे आहे कि भारताच्या बाजूने उभे रहायचे आहे ? हे तिने ठरवावे. तथापि ‘इंडिया आऊट’ला समस्त भारतियांचे मात्र ‘माल’वून टाक दीव’ आणि उजळू दे ‘लक्षद्वीप’, हेच उत्तर असेल !
शत्रूच्या सुरात सूर मिसळणार्या ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांना जनता निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल ! |