‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

  • उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश येथेही अशीच स्थिती

  • ‘एल् निनो’चा परिणाम असल्याचा तज्ञांचा दावा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – यावर्षी काश्मीरमधील तापमान उणे ३ ते ५ डिग्री सेल्सियस इतके खाली गेलेले असतांनाही तेथे बर्फवृष्टी झालेली नाही. एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी यामुळे काश्मीरला जाण्याचे रहित केले आहे. काश्मीरच नाही, तर उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश राज्यांतही अशीच स्थिती आहे. काश्मीरमध्ये बर्फाविना हिवाळ्याची १० वर्षांतील ही तिसरी वेळ आहे.

सौजन्य : न्यूज 9 

१. जम्मू-काश्मीर हवामान विभागाचे संचालक डॉ. मुख्तार अहमद यांच्या मते, ‘एल् निनो’मुळे बर्फ पडलेला नाही, तसेच समुद्राचे तापमान ०.५ अंशांनी वाढले आहे. यामुळे संपूर्ण देशात हवामानाचा अंदाज पालटला आहे.

२. भूवैज्ञानिक शकील अहमद यांनी सांगितले की, जागतिक तापमानवृद्धीमुळे २१व्या शतकाच्या अखेरपर्यंत काश्मीरमध्ये ४० वर्षे बर्फाविना जाऊ शकतात.

३. जम्मू-काश्मीरमध्ये १५ जानेवारीपर्यंत अशीच स्थिती रहाणार आहे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस बर्फवृष्टी झाली नाही, तर काश्मीर खोर्‍यातील अनेक भागांत दुष्काळ पडू शकतो.

काय आहे ‘एल् निनो’ ?

‘एल् निनो’ ही प्रशांत महासागरात सिद्ध झालेली हवामान स्थिती आहे, जिचा बाष्पाने भरलेल्या मोसमी वार्‍यांवर परिणाम होतो. ‘एल् निनो’चा परिणाम विविध देशांच्या हवामानावर होतो. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि आसपासचे देश, तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि प्रशांत महासागराला जोडलेले अनेक देश यांना ‘एल् निनो’चा फटका बसतो.