मुंबई – अतीदक्षता विभागातील एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डवरून सायबर चोरट्यांनी ५ लाख रुपयांचा व्यवहार केला. या फसवणुकीच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
एका महिलेच्या पतीवर विक्रोळी येथील गोदरेज रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. तक्रारदार महिलेला तिच्या पतीच्या भ्रमणभाषवर एक संपर्क आला होता. त्यात बोलणार्याने बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्याच्या सांगण्याप्रमाणे क्रेडित कार्डवरील शुल्क माफ करून घेण्यासाठी तिने ऑनलाईन अर्ज करून संकेतस्थळावर दिल्याप्रमाणे सर्व माहिती भरली. त्यानंतर तिच्या पतीच्या क्रेडिट कार्ड खात्यातून एकूण ४ लाख ८८ सहस्र रुपये हस्तांतरीत झाले. यामुळे तिला धक्का बसला. तिने चौकशी केली असता, बँकेच्या अधिकार्यांनी असा कोणताही व्यवहार झाला नसल्याचे सांगितले.
संपादकीय भूमिका :सायबर चोरट्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित ! तसे झाल्यासच हे प्रकार थांबतील ! |