८ जानेवारी या दिवशीच्या अंकात पू. संदीप आळशी यांचे दैवी गुण पाहिले. आता या भागात त्यांनी साधकांना साधना आणि सेवा यांसाठी केलेले मार्गदर्शन पहाणार आहोत.(भाग २)
६. पू. संदीपदादांनी सत्संगात केलेल्या मार्गदर्शनातील काही महत्त्वाची सूत्रे
६ अ. सवलत न घेता व्यष्टी साधना गांभीर्याने करायला हवी ! : साधकांमध्ये साधनेविषयी तळमळ आणि गांभीर्य नसेल, तर व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांमधे सवलत घेतली जाते. साधकाचे साधनेचे प्रयत्न न्यून झाले, तर त्याने प्रायश्चित्त घेतले पाहिजे आणि स्वतःमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण करण्यासाठी स्वयंसूचनाही घेतल्या पाहिजेत. व्यष्टी साधना चांगली केली, तर साधनेतील अडथळे दूर होणार आणि सेवा चांगली केली, तर श्री गुरूंची कृपा होणार !
६ आ. ध्येय ठेवून साधनेचे प्रयत्न सातत्याने वाढवत रहायला हवेत ! : एकदा आश्रमात एक तबलावादक आले होते. ते सलग ८ – ८ घंटेही तबलावादन करायचे आणि एवढा वेळ तबलावादन करूनही ते सतत उत्साही असायचे. पू. संदीपदादांनी सत्संगात त्यांचे उदाहरण सांगितले. ते म्हणाले, ‘‘एवढा वेळ तबलावादन करूनही ते उत्साही कसे काय असतात ?; कारण त्यांनी ठरवले आहे, ‘आता पुन्हा मागे जायचे नाही.’ (There is no return) आणि त्यांचे हेच ध्येय त्यांना सतत प्रेरणा देत रहाते. त्यामुळे ते उत्साही असतात. त्यांचा आदर्श आपण डोळ्यांपुढे ठेवायचा आणि सतत पुढेच जायचे. (म्हणजे आपण जे साधनेचे प्रयत्न करत आहोत, ते न्यून होऊ न देता वाढवत रहायचे.)
६ इ. समयमर्यादा घालून सेवा करायला हवी ! : सेवेला समयमर्यादा नसेल, तर सेवेला वेग येत नाही. सेवांचे नियोजन समयमर्यादा घालून केले, तर निरुत्साह आणि मरगळ जाऊन सेवेची गती वाढते. त्यासाठी प्रतिदिन साधकांनी आपल्या सेवांचे समयमर्यादा घालून नियोजन केले पाहिजे. कितीही अडचणी असल्या, तरी तळमळ असेल, तर मार्ग निघतो.
६ ई. ध्येयाचा ध्यास घेऊन प्रयत्न करायला हवेत ! : आपल्याला ध्येयाचा ध्यास नसतो, तोपर्यंत आपल्या प्रयत्नांमधे परिपूर्णता नसते. त्यामुळे साधकांनी ध्येय ठेवून त्याचा ध्यास मनाला लावून घेतला पाहिजे. त्यासाठी स्वयंसूचना देऊन मनाला सतत ध्येयाची जाणीव करून दिली पाहिजे. ‘मी माझा वैयक्तिक वेळ न्यून करून तो वेळ सेवेला देण्याचा प्रयत्न कसा करू ?, सेवा अधिक कशी होईल ?, साधना चांगली कशी होईल ?’, याकडे साधकांनी सतत लक्ष दिले पाहिजे.
६ उ. स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करायला हवा ! : आपल्या प्रत्येकात पुष्कळ क्षमता, ऊर्जा आणि शक्ती आहे; पण ती सुप्त आहे. आपण आपली क्षमता जागृत केली पाहिजे आणि आपली क्षमता ओळखून तिचा पूर्णपणे उपयोग केला पाहिजे.
६ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे कुठेही वेळ वाया जाऊ न देता साधना आणि सेवा केली पाहिजे ! : एकदा पू. संदीपदादांनी एका साधिकेला ग्रंथनिर्मिती सेवेतील आम्हा सर्वांची दैनंदिनी बघायला सांगितली. तेव्हा २ साधिका काही वेळ परात्पर गुरुदेवांच्या आठवणींविषयी बोलत होत्या. तेव्हा पू. संदीपदादांनी त्यांना विचारले, ‘‘गुरुदेवांना त्यांचे कार्य पुढे नेलेले आवडणार कि त्यांच्याविषयी बोलण्यात वेळ घालवलेला आवडणार ?’’ त्यांनी गुरुदेवांचेच उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘पूर्वी गुरुदेव ‘पायर्या चढणे-उतरणे’, असा व्यायाम करायचे. तेव्हा त्यांच्या एका हातात ‘पॅड’वर मुद्रित शोधनाच्या प्रती लावलेल्या असायच्या. गुरुदेव पायर्या चढ-उतर करतांना ते वाचत असत. गुरुदेव तो वेळही कार्य पुढे नेण्यासाठी वापरायचे. यातून शिकून आपण आपला वेळ अधिकाधिक सेवा आणि साधना यांसाठी दिला पाहिजे. आपला थोडाही वेळ वाया जायला नको.’’
६ ए. ‘सहसाधकांविषयी मनात प्रतिक्रिया येऊ नयेत’, यासाठी त्यांनी केलेले साहाय्य किंवा त्यांचे गुण आठवावे आणि मनाला तशा स्वयंसूचना द्याव्या ! : साधकांच्या मनात अनेक वेळेला सहसाधकांविषयी प्रतिक्रिया येतात किंवा पूर्वग्रह निर्माण झालेला असतो. त्याविषयीच्या विचारांमुळे त्यात त्यांचा वेळ वाया जातो आणि सकारात्मकता न्यून होते. अशा वेळी ‘ज्यांच्याविषयी आपल्या मनात प्रतिक्रिया येतात किंवा पूर्वग्रह असतो, त्यांनी आपल्याला वेळोवेळी केलेले साहाय्य आठवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि दिवसभर मनाला तशी स्वयंसूचना द्यावी. त्यामुळे आपल्या मनातील पूर्वग्रह आणि प्रतिक्रिया न्यून होऊ शकतात.’’
६ ऐ. नातेवाइकांत न अडकता केवळ ईश्वराशी जोडून रहायला हवे ! : आपल्या सर्वांना नातेवाईक आहेत; परंतु आपण त्यांच्यात अडकायचे नाही. आपला वेळ अधिकाधिक सेवा आणि साधना यांसाठीच आपण दिला पाहिजे. ‘आपले खरे नाते केवळ ईश्वराशीच आहे’, हे आपण नेहमीच लक्षात घेतले पाहिजे.
६ ओ. सेवा आणि साधना यांतून आनंद मिळायला हवा ! : ‘साधकांना सेवेतून आनंद मिळवा’, यासाठीच गुरुदेवांनी सेवा दिली आहे. आनंदच आपला देव आहे. आपल्याला प्रत्येक कृतीतून आनंद मिळाला पाहिजे. सेवा आणि साधना यांतूनच आपल्याला आनंद मिळणार आहे. इतरांच्या अनावश्यक गोष्टींमधे लक्ष दिले, अनावश्यक बोललो, अनावश्यक विचार केला, तर आनंद न्यून होतो. त्यासाठी अशा अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजेत.
६ औ. सेवेचा कर्तेपणा नको : श्री गुरूंचे कार्य दैवी आहे. आपण काही केले नाही, तरी ते पूर्णत्वाला जाणारच आहे. त्यामुळे ‘आपण सेवा करतो’, असा कर्तेपणा वाटायला नको.
६ अं. आश्रमात रहाणार्या साधकांनी आश्रमाविषयी पुष्कळ कृतज्ञताभाव वाढवायला हवा ! : एकदा आमच्या सत्संगात प्रसारात सेवा करणार्या साधिका बसल्या होत्या. त्यांनी सांगितले, ‘‘घरी राहून प्रसार करणारे साधक ‘आपण आश्रमात आहोत’, असा भाव ठेवतात, उदा. ते नामजप करतांना ‘मी आश्रमातल्या ध्यानमंदिरात बसून नामजप करत आहे’ किंवा ‘घरातील केर काढतांना आश्रमातला केर काढत आहोत’, असा भाव ठेवतात. त्यांना तशा अनुभूतीही येतात. तेव्हा पू. संदीपदादा आम्हाला म्हणाले, ‘‘आपण आश्रमातच रहातो; पण ‘आपला भाव किती असतो ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करा. घरी रहाणारे साधक आश्रमातल्या अनुभूती अनुभवतात. आपण आश्रमात प्रत्यक्ष रहात असूनही आपल्याला अशा अनुभूती येत नाहीत. आपण आपला कृतज्ञताभाव पुष्कळ वाढवला पाहिजे.’’
७. पू. संदीप आळशी, म्हणजे अखंड वहाणारी ज्ञानगंगा असणे
पू. संदीपदादा म्हणजे अखंड वहात असलेली निर्मळ ज्ञानगंगा आहे. या गंगेतील ज्ञानजल ओंजळीत भरून घेण्यासाठी आमचे हात पुष्कळ छोटे आहेत. पू. संदीपदादांच्या या वहात्या ज्ञानगंगेत आम्ही चिंब चिंब भिजत असतो. केवळ गुरुदेवांच्या अपार कृपेनेच मला पू. संदीपदादांचा सहवास मिळत आहे.
८. कृतज्ञता
प्रत्येक वेळी प.पू. गुरुदेवांना बघितल्यावर आणि त्यांच्याशी बोलल्यावर ‘रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ।।’ या संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या ओवीची अनुभूती मी घेत असते. आता गुरुकृपेने तीच अनुभूती मला पू. संदीपदादांना भेटल्यावर आणि त्यांच्याशी बोलल्यावर येऊ लागली आहे. मला पू. संदीपदादांकडून पुष्कळ शिकायला मिळते. त्यासाठी मी ही शब्दरूपी कृतज्ञतापुष्पे श्री गुरुआणि पू. संदीपदादा यांच्या चरणी शरणागतभावाने अर्पण करते.
९. प्रार्थना
‘गुरुदेव, मला तुम्ही आणि पू. संदीपदादा यांना अपेक्षित असे घडता येऊ दे आणि अखंड शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’(समाप्त)
– कु. मधुरा गोखले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२३)