पुणे येथील ‘बालगंधर्व रंगमंदिरा’ची जुनी इमारत पाडणार ! – नितीन करीर, मुख्य सचिव

पुणे – येथील बालगंधर्व रंगमंदिराची जुनी झालेली इमारत पाडून तेथे नवे नाट्यगृह बांधण्याचा प्रस्ताव दीड वर्षे पडून होता. आता राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी ‘बालगंधर्व रंगमंदिराचा नवा आराखडा ठरवला असून पुढील काही दिवसांमध्ये जुनी इमारत पाडली जाईल’, असे सांगितले. ते बालगंधर्व रंगमंदिरातील एका कार्यक्रमामध्ये बोलत होते.

बालगंधर्व रंगमंदिर जुने झाल्याने तेथे नवे नाट्यगृह बांधले जावे, अशी नाट्य, चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंतांची इच्छा होती; ‘परंतु त्याचा व्यावसायिक वापर होऊ नये’, असेही त्यांचे म्हणणे होते; मात्र महापालिकेच्या अधिकार्‍यांनी मुंबई येथील ‘जिओ मॉल’ची पहाणी करून सुधारित आराखडा सिद्ध केला होता; मात्र नाट्यगृहाच्या ऐवजी ‘मॉल’ केला जाणार ? कलेऐवजी व्यावसायिक विचार केला जाणार आहे, त्यामुळे कलाकारांमधून विरोधाचा सूर निर्माण झाला होता. होत असलेला विरोध पाहून महापालिकेने प्रस्ताव मागे घेत मे २०२२ पासून पुनर्विकासाचा प्रस्ताव बाजूला ठेवण्यात आला होता; परंतु आता  या प्रक्रियेला गती येण्याची शक्यता आहे.