दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पी.एम्.पी.च्या उत्पन्नात वाढ !; सायबर चोरांनी डॉक्टरांना फसवले !…

पी.एम्.पी.च्या उत्पन्नात वाढ !

पुणे – ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पी.एम्.पी.) वर्ष २०२२ मध्ये प्रवासी तिकीट आणि पास यांमधून ६०९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. वर्ष २०२३ मध्ये प्रवासी उत्पन्नात ८५ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. ‘पी.एम्.पी.’चे अध्यक्ष म्हणून ओमप्रकाश बकोरिया यांनी पदभार घेतल्यानंतर विविध उपाययोजना करून उत्पन्नासमवेतच चांगली प्रवासी सेवा देण्यावर भर दिला.


सायबर चोरांनी डॉक्टरांना फसवले !

छत्रपती संभाजीनगर – ‘ट्रेडिंग मार्केटिंग’मध्ये गुंतवणूक केल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमीष दाखवून बीड शहरातील डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांना सायबर चोरांनी तब्बल ५७ लाख २० सहस्र रुपयांना गंडा घातला आहे. या प्रकरणी ३ जणांच्या विरोधात बीड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अतीलोभापोटी आमिषांना भुलू नये, हे दर्शवणारी घटना !


पोलिसांच्या समुपदेशानंतर ८८ जोडप्यांचे घटस्फोट टळले !

छत्रपती संभाजीनगर – ग्रामीण पोलिसांच्या ‘भरोसा सेल’अंतर्गत असलेल्या साहाय्यता कक्षाने ८ मासांत ८८ जोडप्यांचे संसार पुन्हा सुरळीत केले. या कक्षात अन्यायग्रस्त महिलांच्या तक्रारी समवेत गेल्या काही मासांत पत्नीपीडित असलेल्या १२ पुरुषांनीही साहाय्यता मागितली होती. ‘भरोसा सेल’अंतर्गत तक्रारीच्या अनुषंगाने पती-पत्नीचे समुपदेशन केले जाते. यासाठी कक्षातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करतात. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत असलेल्या महिला साहाय्यता कक्षात नोव्हेंबरअखेर ४१६ तक्रार अर्ज प्राप्त झाले होते.


नागपूर येथे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्याला अटक !

नागपूर – मकरसंक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंगोत्सवासाठी वापरण्यात येणार्‍या नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी असूनही त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणार्‍यांच्या विरोधात राज्यभरात पोलिसांकडून मोहीम राबवण्यात येत आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणार्‍या एका आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने ६ जानेवारी या दिवशी अटक केली आहे. या विक्रेत्याकडून पोलिसांनी १३ सहस्र ६०० रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. नंदकिशोर मौंदेकर असे त्या आरोपीचे नाव आहे.


मुंबईत ६ ठिकाणी बाँब ठेवल्याची अफवा !

मुंबई – वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रासह ८ महत्त्वाच्या ठिकाणी बॉंब ठेवण्यात आले असल्याचा ई-मेल ६ जानेवारी या दिवशी संबंधित संस्थांना एकाच पत्त्यावरून आला. त्यानंतर ही अफवा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर बाँबची अफवा पसरवणार्‍यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक सिद्ध केले. कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, भायखळा येथील प्राणीसंग्रहालय यांनाही हा मेल आला होता.