Darpankar Award Refusal : प्रभु श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍यांकडून पुरस्कार स्वीकारण्यास नकार !

दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांचा बाणेदारपणा !

‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’

मुंबई : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक श्री. किरण शेलार यांनी भगवान श्रीरामाचे अस्तित्व नाकारणारे दैनिक ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे यांच्याकडून ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ स्वीकारण्यास नकार दिला. श्री. किरण शेलार यांच्या या बाणेदारपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दैनिक मुंबई ‘तरुण भारत’चे संपादक किरण शेलार (डावीकडील), दैनिक ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे (ज्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला)

१. ५ जानेवारी या दिवशी ‘पत्रकारदिना’च्या पूर्वसंध्येला मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या २३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात पत्रकारांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

२. मराठी वृत्तपत्र लेख संघाच्या वतीने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांमध्ये ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक श्री. किरण शेलार यांना प्रदान करण्यात येणार होता. या वेळी व्यासपिठावर उपस्थित दैनिक ‘देशोन्नती’चे संपादक प्रकाश पोहरे यांनी ‘या देशात राम न मानणारे आणि राम मानणारे असे दोन भाग आहेत. काही जणांना राम ही कपोलल्पित संकल्पना वाटते’, असे नास्तिकतावाद्यांची तळी उचलून धरणारे वक्तव्य केले.

३. या वेळी देशातील अनेक समस्यांचा पाढाही पोहरे यांनी वाचला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रकाश पोहरे यांनी भूषवले होते. त्यांच्याच हस्ते श्री. किरण शेलार यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता; मात्र हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारे प्रकाश पोहरे यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास श्री. किरण शेलार यांनी स्पष्ट नकार दिला.

हिंदूंनी सगळ्यांच्या भावनांचा आदर करावा; मात्र त्यांच्या भावनांचा कुणीही आदर करू नये, असे यापुढे चालणार नाही ! – किरण शेलार, संपादक, दैनिक ‘मुंबई तरुण भारत’

श्री. किरण शेलार

वस्तूत: झालेला प्रकार हा चांगला नव्हताच. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार असल्याने मी होकार दिला होता. अन्य वक्त्यांची भाषणे ही मला न पटणारी असली, तरी ती त्यांची मते होती. प्रकाश पोहरे यांनी मात्र श्रीरामाच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह करत अप्रस्तुत विधाने केली. कार्यक्रमात तसे बोलण्याचे औचित्यही नव्हते. माझ्या मते अशा माणसाच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणे अयोग्य होते. हिंदूंनी सगळ्यांच्या भावनांचा आदर करावा; मात्र त्यांच्या भावनांची कुणीही आदर करू नये, हे यापुढे चालणार नाही. मला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने दिल्या जाणार्‍या पुरस्काराचा अवमान करायचा नव्हता. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून मी कार्यक्रमातून निघून आलो.

४. प्रकाश पोहरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सडेतोड बोलत श्री. किरण शेलार म्हणाले, ‘‘माझ्या आधीच्या वक्त्यांनी मांडलेल्या देशातील समस्या खर्‍या आहेत; मात्र भगवान श्रीरामाचे अस्तित्वही खरे आहे. श्रीरामाला काल्पनिक मानणार्‍यांकडून मला पुरस्कार नको. मी तो स्वीकारणार नाही; मात्र दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा अपमान मला करायचा नाही. यानंतरही पुरस्कार द्यावा कि देऊ नये, याविषयी मराठी वृत्तपत्र लेखक संघाने निर्णय घ्यावा.’’

५. श्री. किरण शेलार यांनी व्यासपिठावरून मांडलेल्या या भूमिकेचे प्रेक्षकांकडूनही ‘जय श्रीराम’चा जयघोष करत स्वागत करण्यात आले. यावर दैनिक ‘प्रहार’चे संपादक सुकृत खांडेकर यांच्या हस्ते श्री. किरण शेलार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संपादकीय भूमिका

अशी बाणेदार वृत्ती दाखवणारे ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांचे अभिनंदन ! मागील अनेक दशके निधर्मीवादी पत्रकारितेच्या नावाखाली हिंदु धर्म, धर्मग्रंथ आणि संस्कृती यांच्यावर द्वेषमूलक टीका करण्यात आली. त्यामुळे हिंदु समाजाची अतोनात हानी झाली. या पार्श्‍वभूमीवर हिंदुत्वासाठी श्री. शेलार यांनी घेतलेली सडेतोड भूमिका सर्वांसाठीच आदर्श आहे !  

हे ही वाचा –

♦ संपादकीय : धर्मतेजाचे किरण !
https://sanatanprabhat.org/marathi/752756.html