श्रीराममंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हनुमान, तसेच गजराज, सिंह, आणि गरुड यांच्या सात्त्विक मूर्तींची स्थापना !

२२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्रीराममलाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने …

श्री हनुमान, गजराज, सिंह आणि गरुड यांच्या मूर्ती

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमीत २२ जानेवारी या दिवशी श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हा अलौकिक दिवस जसा जवळ येत आहे, तशी कोट्यवधी हिंदूंची उत्कंठा आणि उत्साह उत्तरोत्तर वाढत चालला आहे. अशातच ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ने त्याच्या ‘एक्स’वरील खात्यावरून पोस्ट करून श्रीराममंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या श्री हनुमान, गजराज, सिंह आणि गरुड यांच्या मूर्तींची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यांची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. फिक्या गुलाबी रंगाच्या या मूर्ती अतिशय सात्त्विक दिसतात. राजस्थानच्या बंसीपहाडपूर गावातून हे दगड अयोध्येत आणण्यात आले. या दगडाला ‘बलुआ दगड’ म्हणतात.

सिंहद्वारापासून ३२ पायर्‍या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश करता येतो. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मूर्ती मंदिराच्या पायर्‍यांजवळ विराजमान करण्यात आल्या आहेत. या कलाकृती बिहार, उत्तरप्रदेश आणि गुजरात येथील कारागिरांनी बनवल्या आहेत.