ISRO  Aditya L1:सूर्याचा अभ्यास करणारे ‘इस्रो’चे ‘आदित्य एल् १’ अंतराळयान ‘लॅग्रेंज पॉईंट’वर पोचले !

  • १२६ दिवसांत १५ लाख कि.मी.चा केला प्रवास !

  • पुढील ५ वर्षे करणार अभ्यास !

‘आदित्य एल् १’

बेंगळुरू (कर्नाटक) – भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रोने) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित केलेले ‘आदित्य एल् १’ हे यान ‘लॅग्रेंज पाईंट १’वर अंततः ६ जानेवारीला दुपारी पोचले. हे यान २ सप्टेंबर २०२३ या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले होते. १२६ दिवसांत १५ लाख कि.मी.चा प्रवास करून दुपारी ४ च्या सुमारास येथील ‘हॅलो ऑर्बिट’मध्ये असलेल्या या पॉईंटवर पोचले. पुढील ५ वर्षे हे यान येथे सूर्याचे परीक्षण करणार आहे. या यशासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा देणारी पोस्ट एक्सवर केली आहे.

‘लॅग्रेंज पॉइंट १’ म्हणजे काय?


इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफ-लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून ‘लॅग्रेंज पॉइंट’चे नाव देण्यात आले आहे. त्याला ‘एल् १’ असेही म्हटले जाते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे ५ बिंदू आहेत, जेथे सूर्य आणि पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल संतुलित आहे. या ठिकाणी कोणतीही वस्तू ठेवल्यास ती त्या बिंदूभोवती सहज फिरू लागते. पहिला लॅग्रेंज पॉइंट पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये १५ लाख किलोमीटर अंतरावर आहे. या बिंदूवर ग्रहणाचा कोणताही प्रभाव नाही. या स्थानावरून सूर्य १५ कोटी किलोमीटर अंतरावर आहे.