सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात सरकारकडे मागणी !
सोलापूर, ५ जानेवारी (वार्ता.) – हिंदु देवतांविषयी नेहमी अपमानकारक वक्तव्ये करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘राम हा मांसाहारी होता’ असे आक्षेपार्ह वक्तव्य करून प्रभु श्रीरामचंद्र आणि हिंदु धर्म यांचा घोर अपमान केला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी केली. ५ जानेवारी या दिवशी येथील जिल्हा परिषद, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार (पूनम गेट) या ठिकाणी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते. या आंदोलनात श्री. पवन देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्री. राजशेखर गुंड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. बापू ढगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे, विपुल भोपळे यांनीही मनोगत व्यक्त केले. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे शिबिर चालू असतांना आव्हाड अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील आणि तरीही त्यांच्यावर कारवाई होत नसेल, तर याचा अर्थ आव्हाड यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे, असे दिसून येते. अशा प्रकारचे वक्तव्य करून जितेंद्र आव्हाड हे हिंदु धर्माची अपकीर्ती करत आहेत. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. असे असतांनाही आव्हाड यांनी ‘मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे’, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्या जितेंद्र आव्हाड यांना त्वरित अटक करण्यात यावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली.