अयोध्या – ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंच्या प्रभावी संघटनामुळे श्रीराममंदिराची स्थापना होत आहे. इतिहासातून धडा शिकून आपले मंदिर सुरक्षित रहावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना आवश्यक आहे. ‘हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी जो कार्य करील, त्यालाच समर्थन मिळेल’, अशी भूमिका हिंदु समाजाने घेतली पाहिजे. केवळ विकास नाही, तर आता धर्मावर आधारित राज्यव्यवस्थेची आवश्यकता आहे. यासाठी अविरत संघर्ष करण्यासाठी आपण सिद्ध रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे अयोध्या समन्वयक श्री. प्रशांत वैती यांनी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त केले. समितीच्या वतीने कुमारगंजमधील उसरहन भवानी मंदिराच्या परिसरात ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आयोजित करण्यात आली होती. या सभेला सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर यांनीही मार्गदर्शन केले. सभेचे आयोजन, प्रचार आणि प्रसार यांत सर्वश्री मनीष गुप्ता, मनीष पांडे, चंद्रभान सिंह आदी धर्मप्रेमींनी सहकार्य केले.
‘मी सनातन धर्मरक्षक’ या अभियानामध्ये सहभागी व्हा ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था
भारत हिंदुबहुल देश असल्यामुळे येथील भिन्न पंथ, संप्रदाय, भाषा इत्यादींचे लोक एकत्र रहात आहेत. असा ‘वसुधैव कुटुम्बकम्’चा (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) संदेश देणार्या सनातन धर्मालाच नष्ट करण्याचे षड्यंत्र रचण्यात येत आहे. त्यामुळे ‘मी सनातन धर्मरक्षक’ या अभियानामध्ये सहभागी होऊन सनातन धर्माचे श्रेष्ठत्व समाजात बिंबवण्याची आवश्यकता आहे. यासमवेतच हिंदूंनी नित्य धर्माचरण करून देवतांची उपासना केली पाहिजे.
वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्रे
१. ‘श्री चंद्रबली सिंह उर्मिला पदव्युत्तर महाविद्यालया’चे व्यवस्थापक श्री. चंद्रबली सिंह आणि ‘सरस्वती विद्यालया’चे व्यवस्थापक श्री. बैजनाथ हे त्यांची नियोजित बैठक रहित करून धर्मसभेला उपस्थित राहिले. श्री. चंद्रबली सिंह यांना सभेची निमंत्रणपत्रिका मिळाल्यावर त्यांनी त्याची माहिती महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना त्वरित दिली.
२. या सभेला तरमा, गोयाडी, पिठला आदी गावांमधून अनेक हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते आणि ‘डॉ. नरेंद्र देव कृषी विद्यापिठा’चे विद्यार्थी उपस्थित होते.