Power Failure : विद्युत रोहित्रातील बिघाडामुळे २ आठवड्यांपासून तोरणा गड अंधारात !

वीजपुरवठा तातडीने चालू करण्याची ‘स्थानिक मावळा संघटने’ची मागणी !

वेल्हे (जिल्हा पुणे) – विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यामुळे तोरणा गडावरील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. वीजेअभावी २० डिसेंबरपासून तोरणा गड अंधारात आहे. गडावर येणार्‍या पर्यटकांसह गडावरील पहारेकरी आणि डागडुजीची कामे करणारे कामगार यांची असुविधा होत आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत रोहित्राची दुरुस्ती करण्यात येणार होती; पण रोहित्राचे काम रखडले आहे. याविषयी ‘स्थानिक मावळा संघटने’चे वेल्हे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर वेगरे, रामभाऊ राजीवडे, बापू साबळे आदींनी वेल्हे येथील महावितरण कार्यालयाला निवेदन देत गडावरील वीजपुरवठा तातडीने चालू करण्याची मागणी केली आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडावर वीज आली होती !

राज्यातील अतीदुर्गम तोरणा गडावर स्वातंत्र्यानंतर नुकतीच प्रथमच वीज आली होतीे; मात्र गडावर वीजपुरवठा चालू झाल्यापासून तो वारंवार खंडित होत आहे. महावितरणचे शाखा अभियंता विनोद थेटे यांनी सांगितले की, तोरणागडाला वीजपुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाले आहे. तेथे नवीन रोहित्र बसवण्यात येणार आहे. महावितरणचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांनी तातडीने कार्यवाही चालू केली आहे. संबंधित ठेकेदाराकडून २ दिवसांत रोहित्रे बसवण्यात येतील.

संपादकीय भूमिका

  • छत्रपती शिवरायांच्या गडाच्या संदर्भात अशी स्थिती निर्माण होण्याला उत्तरदायी असलेल्या उत्तरदायी अधिकार्‍यांवर सरकारने कठोर कारवाई करणे अपेक्षित !