मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असणारे ज्युलिओ रिबेरो हे नाव सर्वांच्याच परिचयाचे आहे. त्यांचे वय ९४ वर्षे आहे. वार्धक्याचा काळ असला, तरी ते अजूनही कार्यरत आहेत. गोवा येथे झालेल्या एका पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात ते सहभागी झाले होते. येथे त्यांनी केलेले एक विधान सर्वत्र प्रसारित झाले असून त्याला विरोध केला जात आहे. ‘पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिस्ती हे अत्यंत भीतीदायक वातावरणात जीवन जगत आहेत. तशीच स्थिती भारतात निर्माण होऊ शकते’, असे त्यांनी म्हटले. रिबेरो यांचे ख्रिस्तीप्रेम काही नवीन नाही. याआधीही त्यांनी ‘मी ख्रिस्ती म्हणून एका झटक्यात या देशात परका झालो’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते. त्यांचे लेख अनेक कथित धर्मनिरपेक्षतावादी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असतात. या लेखांचा अभ्यास करता, त्यांचे अंतरंग लक्षात येते. या लेखांमधून त्यांचा मोदीद्वेष दिसतो. अनेक ख्रिस्ती संघटनांना देण्यात येणारा विदेशी निधी बंद झाल्यामुळे त्यांना पोटशूळ उठला असून त्यांनी अनेक ठिकाणी याविषयीच्या त्यांच्या भावनांद्वारे तो व्यक्त केला आहे. या रिबेरो महाशयांना एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘‘जर त्यांना पाकमधील अल्पसंख्य हिंदूंची इतकीच काळजी आहे, तर मग त्यांनी आतापर्यंत त्या पीडितांसाठी काय केले ?’’ रिबेरो यांनी त्या हिंदूंसाठी ना कधी आवाज उठवला, ना त्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेऊन पाकविरोधात वैचारिक लढा दिला. एकीकडे ख्रिस्त्यांची बाजू घेणारे रिबेरो धर्मांतराचे षड्यंत्र रचणार्या याच ख्रिस्त्यांच्या विरोधात मात्र मूग गिळून गप्प बसतात, हे वास्तव नाकारून चालणार नाही. ननवर होणारे अत्याचार, वासनांध वृत्तीचे बिशप किंवा ख्रिस्ती धर्मगुरु यांना रिबेरो यांनी कधी विरोध केल्याचे पाहिले नाही, ना त्यांना त्यांच्या अशा कृत्यांची जाणीव करून दिली, चर्चमधील अपप्रकारांच्या विरोधातही ना कधी आवाज उठवला ! आपण ज्या समुदायातून येतो, त्या समुदायाच्या भल्यासाठी किंवा त्याच्या उत्कर्षासाठी वेळोवेळी आवाज उठवणे, यात चुकीचे काही नाही; मात्र ही टीका वस्तूनिष्ठ हवी. त्याविषयी भाष्य करतांना पुरावे हवेत. एक नामांकित, कर्तव्यनिष्ठ माजी पोलीस अधिकारी म्हणून जनता याची अपेक्षा नक्कीच करू शकते.
इतकी वर्षे पोलीस अधिकारी म्हणून पदावर कार्यरत राहिल्यानंतर रिबेरो यांनी समाजाची नस ओळखली आहे, असे कसे म्हणता येईल ? ‘बहुसंख्य हे अल्पसंख्यांकांच्या जिवावर उठलेले असतात’, ही पाश्चात्त्य विचारसरणी. भारतीय समाजाला ती कशी लागू होऊ शकते ? असे असते, तर रिबेरो यांना जो मान-सन्मान येथील सामान्य जनतेने दिला, तो त्यांना मिळू शकला असता का ?
ख्रिस्तीप्रेम आणि मोदीद्वेष !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहली येथे नाताळच्या दिवशी काही ख्रिस्ती लोकांशी संवाद साधला. याविषयी बोलतांना रिबेरो म्हणाले, ‘‘पंतप्रधान केरळमधील मोठ्या ख्रिस्ती समुदायाला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’ आता हे विधान बाहेर आले खरे; पण त्यामागील हेतू सुप्त असला, तरी जनतेला तो ठाऊक आहे. ‘ख्रिस्त्यांची मते मिळवण्यासाठी मोदींचा हा खटाटोप चालला आहे’, असा काहीसा समज रिबेरो यांनी करून घेतला आहे. यातून त्यांनी ख्रिस्ती धर्मियांना मोदी यांच्या आहारी न जाण्याचे सूचक विधानही केले आहे. ‘पोलिसांमधील महर्षि’, असा मान रिबेरो यांना आहे; पण अशी द्वेषमूलक विधाने करून त्यांनी स्वतःचे महत्त्व न्यून केले आहे. यापुढे तरी त्यांनी विचारपूर्वक बोलल्यासच त्यांचा यथोचित आदर राखला जाईल.
पंजाबमध्ये स्वतःच्या कार्यकाळात रिबेरो यांनी आतंकवादाचा बीमोड करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांना पोलीस दलातील विशेष अधिकारी म्हणून ओळख प्राप्त झाली. कालांतराने त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. सध्याचे पंजाबमधील चित्र पाहिले, तर ते पूर्णतः वेगळे आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादाने पुन्हा डोके वर काढले आहे. फुटीरतावादी, तसेच खलिस्तानवादी यांनी तेथे उच्छाद मांडला आहे. मोठ्या प्रमाणात हिंसक कारवाया होत आहेत. कोणे एकेकाळी पंजाबमधील असंतोषाच्या विरोधात झटलेले रिबेरो पंजाबमधील सद्य:स्थितीविषयी अवाक्षरही काढत नाहीत. त्यांनी पाहिलेला पंजाब आणि आताचा पुन्हा धुमसणारा पंजाब यांवर टीका करत नाहीत किंवा सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात जागृती करत नाहीत. स्वतःसाठी सोयीस्कर आहे, अशी भाषा उच्चारणे, अशाच लोकांची बाजू घेऊन अन्यांचा द्वेष करणे असे प्रकार त्यांच्याकडून केले जात आहेत. खरेतर इतक्या वर्षांचा अनुभव गाठीशी असतांना, तसेच अनेक राज्यांमध्ये विविध पदभार सांभाळलेला असतांना राष्ट्रीय समस्यांच्या दृष्टीने रिबेरो संबंधितांशी विचारविनिमय करायला हवा, तरच त्या अनुभवांचे खर्या अर्थाने सार्थक होईल !
(म्हणे) ‘हिंदु आतंकवाद होता !’
काही वर्षांपूर्वी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत मुलाखतकाराने त्यांना हिंदु आतंकवादाविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा ते म्हणाले होते, ‘‘मालेगाव बाँबस्फोटाच्या वेळी ते कर्नल पुरोहित वगैरेंचे छोटे सेल होते, तेवढ्यापुरताच तो होता.’’ रिबेरो यांनी हे विधान करतांना प्रथम भारतातील हिंदूबहुल समाजाचा विचार करायला हवा होता; कारण ‘हिंदु आतंकवाद’च मुळात अस्तित्वातच नाही. त्यामुळे ‘तो तेवढ्यापुरता’ असणे तर शक्यच नाही. स्वतः माजी पोलीस अधिकारी असूनही लेफ्टनंट पदावरील व्यक्तीवर हिंदु आतंकवादाचा ठपका ठेवू पहाणे अयोग्य आहे. ज्युलिओ रिबेरो यांचे पोलीस अधिकारी म्हणून असलेले एक रूप सर्वांनीच पाहिले; पण त्यांची आतापर्यंतची सर्व विधाने पहाता त्यांचे खरे स्वरूप सर्वांसमोर उघड होत आहे. ही वस्तूस्थिती पहाता ‘त्यांनी कार्यकाळात दाखवलेली धडाडी किंवा त्यांचे देशप्रेम हे खरे होते का ?’ असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. मतांचे आपमतलबी राजकारण किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधाने न करता प्रत्येकाने देशाशी, पर्यायाने स्वत:च्या कार्याशी आयुष्यभर एकनिष्ठ अन् तत्त्वनिष्ठ रहायला हवे, हा बोध घ्यायला हवा.
ख्रिस्त्यांची बाजू घेणारे ज्युलिओ रिबेरो धर्मांतराचे षड्यंत्र रचणार्या ख्रिस्त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! |