अयोध्येतील श्रीराममंदिरात ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाची मूर्ती स्थापित होणार !

४ सहस्र मजूर २४ घंटे करत आहेत काम !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे चंपत राय यांनी श्रीराममंदिराच्या संदर्भात संपूर्ण माहिती नुकतीच पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, ५ वर्षे वयाच्या प्रभु श्रीरामाची मूर्ती स्थापित केली जाणार आहे. ही मूर्ती देवाच्या बालस्वरूपातील असल्याने मंदिरात माता सीतेची मूर्ती नसेल. तीन मजली श्रीराममंदिराच्या दुसर्‍या मजल्याचे बांधकाम चालू आहे. तळमजला बांधून सिद्ध आहे, तर पहिल्या मजल्याचेही ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. ७० एकरपैकी ३० टक्के जागेवर बांधकाम चालू आहे.

राय यांनी सांगितलेली मंदिरासंदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे –

  • मुख्य मंदिर ३६० फूट लांब, तर २३५ फूट रुंद !
  • १६१ फूट उंच असणार मंदिराचे शिखर !
  • तळमजल्यावर असणार १८ दरवाजे; त्यांपैकी सोन्याने मढवलेले १४ दरवाजे !
  • संपूर्ण संकुलात बांधली जात आहेत आणखी ७ मंदिरे. यामध्ये श्रीरामाचे गुरु ऋषि वसिष्ठ, ऋषि विश्‍वामित्र, ऋषि वाल्मीकि, अगस्त्य मुनी, रामभक्त केवत, निषादराज आणि माता शबरी यांच्या मंदिरांचा समावेश आहे ! यांचे बांधकाम वर्ष २०२४ च्या अखेरपर्यंत होणार पूर्ण !

श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी असा असणार मार्ग !

  • पूर्वेकडील सिंह दरवाजातून मंदिरात प्रवेश होणार.
  • सिंह दरवाजापासून ३२ पायर्‍या चढून गेल्यावर प्रथम रंगमंडप लागेल. येथील भिंतींवर  भगवान श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित चित्रे आणि पात्रे कोरलेली आहेत.
  • रंगमंडपातून पुढे गेल्यावर नृत्य मंडप असेल. येथे देवतांच्या मूर्ती आणि रामायणातील श्‍लोक दगडांवर सुंदरपणे कोरलेले आहेत.
  • पुढे गेल्यावर भगवान श्री रामललाचे गर्भगृह आहे. येथेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

उत्तर भारतात गेल्या २ शतकांत श्रीराममंदिरासारखी इमारत बांधलेली नाही !

श्रीराममंदिरासारखी उभारणी उत्तर भारतात गेल्या २ शतकांत झालेली नाही. मंदिराच्या ज्या भिंती बांधल्या जात आहेत, तशा भिंती केवळ तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतील मंदिरांत बांधल्या जातात. सध्या बांधकाम चालू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी ६ महिने लागतील. या उद्यानांमध्ये वृद्ध आणि अपंग यांच्यासाठी उद्वाहकाची (‘लिफ्ट’ची) सुविधा असणार आहे.