नवी देहली – केंद्र सरकारने ‘मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर’ (मसरत आलम गट) या संघटनेवर बंदी घातली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमांद्वारे ही माहिती प्रसारित केली. ‘देशविरोधी कारवायांमुळे या संघटनेवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत बंदी घालण्यात आली आहे’, असे शहा यांनी म्हटले आहे. या संघटनेची स्थापना मसरत आलम भट्ट याने केली होती. वर्ष २०१९ पासून तो देहलीच्या तिहार कारागृहात बंद आहे.
अमित शहा यांनी म्हटले की, मसरत आलम गटाचे सदस्य जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. हे सदस्य आतंकवादी कारवायांचे समर्थन करतात, तसेच लोकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये इस्लामिक राज्य स्थापन करण्यासाठी प्रवृत्त करतात. सरकारचा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे की, आपल्या देशाची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडता यांच्या विरोधात काम करणार्या कुणालाही सोडले जाणार नाही आणि त्याला कायद्याच्या रोषाला सामोरे जावे लागेल.