हुती बंडखोरांनी लाल समुद्रात पाकिस्तानला जाणार्‍या नौकेवर केले आक्रमण !

कराची (पाकिस्तान) – लाल समुद्रात भारतीय व्यापारी नौकेवर झालेल्या आक्रमणानंतर आता येमेनमधील हुती बंडखोरांनी पाकिस्तानच्या कराची बंदरावर जाणार्‍या एका नौकेवर आक्रमण केले. ही नौका सौदी अरेबियातून निघाली होती. ‘या नौकेवर किती जण आहेत आणि नौकेची किती हानी झाली ?’, हे समजू शकलेले नाही.

सौजन्य विऑन 

१. अमेरिकेच्या सैन्याने सांगितले की, आम्ही गेल्या १० घंट्यांमध्ये हुती बंडखोरांचे १२ ड्रोन, नौकांवरून डागण्यात आलेली ३ क्षेपणास्त्रे आणि भूमीवरून डागण्यात आलेली २ क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत.

२. गेल्या महिन्याभरात हुती बंडखोरांनी १०० हून अधिक आक्रमणे केली आहेत, तर एक मालवाहू नौका कह्यातही घेतली होती. ही इस्रायलची नौका असल्याचे समजून तिचे अपहरण करण्यात आले होते.

कोण आहेत हुती बंडखोर ?

हुती हा येमेनमधील शिया मुसलमानांचा एक सशस्त्र गट आहे. येमेनच्या मोठ्या भूभागावर त्यांचे नियंत्रण आहे. हुतीला इराणचा पूर्ण पाठिंबा आहे. या संघटनेची स्थापना वर्ष १९९० मध्ये येमेनेच्या तत्कालीन अध्यक्षांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी करण्यात आली होती. संघटनेची स्थापना हुसैन अल् हुती यांनी केली होती. त्यांच्या नावावरून संघटनेला हुती नाव पडले आहे. येमेन सरकार आणि हुती यांच्यात गेल्या २ दशकांपासून नागरी युद्ध चालू आहे. येमेन सरकारला सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात अशा सुन्नी अरब देशांचा पाठिंबा आहेे.