Ram Mandir VHP RSS : १ ते १५ जानेवारी या कालावधीत ६० कोटी लोकांना श्रीरामाचे चित्र आणि अक्षता देणार !

विहिंप आणि रा.स्व. संघ यांचे आयोजन !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीराममंदिराच्या उद्घाटनानिमित्त विश्‍व हिंदु परिषद आणि रा.स्व. संघ देशभरात १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत देशभर प्रसार करणार आहे. यांतर्गत १२ कोटी कुटुंबांतील ६० कोटी लोकांना प्रभु श्रीरामाचे चित्र आणि श्रीरामजन्मभूमीवर पूजन करण्यात आलेल्या अक्षता वाटण्यात येतील.

विहिंपकडून २२ जानेवारीला ५ लाख गावांत कार्यक्रमाचे आयोजन !

विहिंपचे केंद्रीय मंत्री अंबरीश म्हणाले की, २२ जानेवारीला देशातील ५ लाख गावांमधील मंदिरे, धार्मिक किंवा सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याची विहिंपची योजना आहे. यामध्ये श्रीराममंदिरातील अभिषेकाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. यामध्ये गावातील सर्व रहिवाशांना बोलावले जाईल, त्यामुळे देशाचा कानाकोपरा ‘राममय’ होईल.

श्रीरामाच्या मूर्तीच्या धनुष्य आणि बाण यांना सोने अन् हिरे लावणार !

श्रीराममंदिरात स्थापन करण्यासाठी एकूण ३ मूर्ती बनवण्यात येत आहेत. त्यांतील एका मूर्तीची निवड करण्यात येणार आहे. या ३ मूर्तींपैकी २ मूर्ती बनवून सिद्ध झाल्या आहेत. म्हैसुरू येथील अरुण योगीराज यांनी या मूर्ती बनवल्या आहेत. या मूर्तीच्या धनुष्य आणि बाण यांच्यावर सोने अन् हिरे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती योगीराज यांनी दिली.