Ujjain Time Zone : विदेशी ‘ग्रीनविच मीन टाइम’ पालटून ‘उज्जैन टाइम’ करणार !

  • मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे विधानसभेत प्रतिपादन !

  • प्राचीन काळापासून उज्जैन शहरच वेळेचे जनक असल्याचेही प्रतिपादन !

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव

भोपाळ (मध्यप्रदेश) : आजपासून ३०० वर्षांपूर्वी संपूर्ण जग भारताचे, म्हणजेच उज्जैनचे ‘टाइम स्टँडर्ड’ (वेळ मोजण्याचे मानक) मान्य करत होते; मात्र काळाच्या प्रवाहामध्ये आपण गुलाम झालो आणि आज आपल्यासह संपूर्ण जग इंग्लंडच्या ‘ग्रीनविच टाइम’चे पालन करत आहे. हे पालटून पुन्हा एकदा भारताच्या, म्हणजे उज्जैन येथील वेळेचे मानक आणण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मध्यप्रदेशमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी विधानसभेत केले.

मुख्यमंत्री डॉ. यादव पुढे म्हणाले की,

१. आम्ही पूर्व, तर ते पश्‍चिम देशाचे आहेत. एक प्राणी सूर्योदयापासून दिनचर्या चालू करतो, तर दुसरा निशाचर आहे, त्याची दिनचर्या सूर्यास्तानंतर चालू होते. मध्यरात्री दिवस पालटण्याचे हे कोणते मानक आहे ? हा भारतीय संस्कृतीला कमी लेखण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जगाची वेळ नीट करण्यासाठी उज्जैनच्या वेधशाळेमध्ये संशोधन करण्यात येईल. आय.आय.टी. आणि आय.आय.एम्. यांच्या संशोधकांकडून हे संशोधन केले जाईल. त्याला जगातील अनेक देश पाठिंबा देतील. यात पाकिस्तान आणि चीन यांचाही समावेश असेल.

२. आमचे सरकार ‘प्राइम मेरिडियन’, म्हणजेच देशांतर्गत रेखा, जिचा उपयोग जागतिक स्तरावर केला जातो, इंग्लंडच्या ग्रीनविचहून उज्जैन येथे हालवण्याचा प्रयत्न करेल.

ग्रीनविच मीन टाइम (जी.एम्.टी.) म्हणजे काय ?

‘ग्रीनविच मीन टाइम’ ही ‘लंडन बरो ऑफ ग्रीनविच’मधील रॉयल वेधशाळेत राखली जाणारी एक मानक वेळ आहे. पृथ्वीचा प्रमुख (प्राईम) मेरिडियन म्हणजेच ‘० रेखांश’ हा ग्रीनविच या लंडनच्या उपनगरातून जातो, असे गृहीत धरले जाते. यामुळेच त्याला जागतिक स्तरावर असाधारण महत्त्व आहे. यूटीसी (कोऑर्डिनेटेड युनिव्हर्सल टाइम) अथवा ग्रीनविच स्थानिक वेळ जागतिक संदर्भ वेळेसाठी आधार म्हणून वापरली जाते. पूर्वी ही मानक वेळ उज्जैन येथून मोजली जात होती. आता ती पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

उज्जैन शहर पृथ्वीची नाभी !

प्राचीन हिंदु खगोलीय मान्यतेनुसार उज्जैन एकेकाळी भारताची केंद्रीय मध्य रेखा मानले जात होते. या शहरापासून देशाची वेळ आणि अंतर मोजले जात होते. हिंदु पंचांगासाठीही याच वेळेचा आधार घेतला जात होता.

 उज्जैन शहरामध्ये कर्क रेखा आणि भूमध्य रेखा एकमेकांना छेदतात. याला पृथ्वीची नाभीही म्हटले जाते. या संदर्भात चर्चा करण्यासाठी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे आयोजन करण्यात येईल. जर आंतरराष्ट्रीय विज्ञान काँग्रेसने हे मान्य केले, तर वेळेचे मानक पालटता येऊ शकतील.