Temple Dress Code : फोंडा (गोवा) तालुक्यातील मंदिरांत वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरांत प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांसंबंधी नियम)

फोंडा तालुक्यातील श्री रामनाथ देवस्थान

फोंडा (गोवा) : मंदिराचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी फोंडा तालुक्यातील अनेक मंदिरांनी १ जानेवारीपासून वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात शॉर्ट्स, मिनी स्कर्ट्स मिडीज, स्लिव्हलेस टॉप्स (हातांच्या बाह्या नसलेले कपडे), लो राईज जिन्स (कबंरेखाली घातली जाणारी विजार) आणि शॉर्ट टी शर्ट्स (आखूड कपडे) आदी प्रकारचे कपडे परिधान करणार्‍यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून मज्जाव केला जाणार आहे. मंदिरात प्रवेश करतांना योग्य वस्त्रे परिधान न केलेल्यांसाठी मंदिर समितीकडून अंग झाकण्यासाठी उपरणे आणि लुंगी उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित व्यक्ती लुंगी आणि उपरणे घालून मंदिरात प्रवेश करू शकतील.

श्री रामनाथ देवस्थानात लावलेला वस्त्रसंहितेचा फलक

फोंडा तालुक्यातील श्री रामनाथ देवस्थानचे अध्यक्ष श्री. वल्लभ कुंकळ्ळीकर यांनी याविषयी सांगितले की, १ जानेवारीपासून वस्त्रसंहितेचे कठोरपणे पालन करण्यात येणार आहे. यासंबंधीची माहिती आम्ही मंदिराच्या सूचना फलकावर (नोटीस बोर्डवर) लावली आहे. मंदिरात येणार्‍या पर्यटकांचे प्रबोधन करण्यासाठी ही नोटीस लावण्यात आली आहे. बहुतांश वेळा पर्यटक मंदिरात येतांना अयोग्य प्रकारे कपडे परिधान करून येतात. मंदिराचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी देवस्थान समितीने वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेतला असून हळूहळू पर्यटकांचेही प्रबोधन होऊन योग्य पालट होईल. ‘प्रौढांसाठी हा नियम असून १० वर्षांखालील लहान मुलांना या नियमातून वगळण्यात आले आहे. मंदिरात प्रवेश करण्यापासून कुणालाही रोखण्यात येणार नाही’, असेही श्री. कुंकळ्ळीकर यांनी स्पष्ट केले.

माशेल येथील श्री देवकीकृष्ण रवळनाथ देवस्थानात लावलेला वस्त्रसंहितेचा फलक

श्री मंगेश देवस्थानाने १० वर्षांपूर्वी वस्त्रसंहिता पाळण्याचा निर्णय घेतला होता. याविषयी देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. अजित कंटक यांनी सांगितले की, यापूर्वी वस्त्रसंहितेचा निर्णय घेतला होता; परंतु त्याचे कठोरतेने पालन होत नव्हते. आता कठोरपणे तिचे पालन करण्यात येईल. काही महिला तोकड्या कपड्यांत मंदिरात प्रवेश करतात. मंदिर हे ‘फॅशन शो’ करण्याचे ठिकाण नसून पूजा आणि ध्यानधारणा करण्याचे ठिकाण आहे. मंदिरात प्रवेश करणार्‍यांनी भारतीय पोशाख परिधान करायला हवा.

संपादकीय भूमिका

मंदिरांचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी तेथे वस्त्रसंहितेचे कठोर पालन करण्याचा निर्णय घेणार्‍या फोंडा तालुक्यातील मंदिर समित्यांचे अभिनंदन !