पुणे येथे ११ सहस्रांहून अधिक नागरिकांनी एकाच पुस्तकातील एक परिच्छेद ३० सेकंदामध्ये वाचला !

 ‘पुणे पुस्तक महोत्सवा’तील विश्वविक्रम

पुणे – येथे ‘फर्ग्युसन महाविद्यालया’च्या प्रांगणामध्ये ‘पुणे पुस्तक महोत्सव’ चालू आहे. २१ डिसेंबर या दिवशी ११ सहस्र ४३ नागरिकांनी ‘एकाच पुस्तकातील एक परिच्छेद’ ३० सेकंदामध्ये वाचून विश्वविक्रम नोंदवला आहे. त्याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आल्याची माहिती अधिकारी स्वप्नील डांगरीकर यांनी दिली. हा विश्वविक्रम ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’च्या सहकार्याने करण्यात आला. सर्वांना आशय एकच हवा, पुनर्वाचन असता कामा नये, अशी आव्हाने त्यात होती. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला भेट देणार्‍या नागरिकांकडून एक परिच्छेद वाचून त्याची चित्रफित (व्हिडिओ) सिद्ध करण्यात आली, तसेच राज्यभरातून नागरिकांनी अशी चित्रफीत पाठवली. याचे सर्व संकलन आणि नियोजन ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठा’च्या तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी केले. त्यांनी १४ सहस्रांहून अधिक नागरिकांची चित्रफीत सिद्ध केली आहे.