संपादकीय : कलंकित शिक्षणमंत्री !

द्रमुक पक्षाचे नेते के. पोनमुडी

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री तथा द्रमुक पक्षाचे नेते के. पोनमुडी आणि त्यांची पत्नी पी. विशालाक्षी यांना बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणी नुकतीच ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दोघांना प्रत्येकी ५० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. पोनमुडी यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत. गुन्हेगारी गैरवर्तन आणि अवैध कमाई असे त्यांच्यावर आरोप आहेत. हे सर्व पहाता ‘मद्रास उच्च न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय घेतला’, असे म्हणता येईल. शिक्षणमंत्र्यांच्या संदर्भात असे घडणे म्हणजे तमिळनाडू राज्यासाठी लज्जास्पद गोष्टच होय ! असे शिक्षणमंत्री विद्यार्थ्यांना नैतिकता आणि संस्कार यांचे धडे काय  देणार ? अशांच्या राज्यातील विद्यार्थी शिक्षणक्षेत्रात तज्ञ होणे तर दूरच, उलट गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार यांच्या जगतातच अग्रेसर होतील, हे निश्चित ! शिक्षणमंत्र्यांनी खरेतर त्यांचे राज्य देशस्तरावर शिक्षणक्षेत्रात कसे आघाडीवर राहील ? नाव मिळवेल, यासाठी प्रयत्नरत रहायला हवे होते; पण पैशांच्या हव्यासापोटी त्यांनी स्वतःच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करून भ्रष्टाचाराने पैसा मिळवणारा मार्ग निवडावा, हे कितपत योग्य ? अशांची पदावरून हकालपट्टी केल्याविना त्यांना धडा मिळणार नाही. शिक्षणमंत्र्यांच्या पत्नीनेही या भ्रष्टाचारात उडी मारली, हे तर समस्त स्त्रीवर्गासाठी लाजिरवाणे आणि तितकेच संतापजनक आहे. भ्रष्टाचार करणार्‍या पतीला वेळीच त्याची कठोरपणे जाणीव करून देणे, हे पत्नीचे कर्तव्य असते; पण येथे तर उलटच घडले आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर पोनमुडी आता सर्वाेच्च न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले, तरीही सर्वाेच्च न्यायालयाकडून जनतेला योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. यात कळीचे सूत्र म्हणजे न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर द्रमुक पक्षाने याविषयी कोणतेही विधान केल्याचे ऐकिवात नाही. ‘अशा भ्रष्ट मंत्र्याला ते पक्षात स्थान देणार कि त्यांची हकालपट्टी करणार ?’, याविषयी पक्षाने कुठे काही भाष्य केल्याचे समजले नाही. यावरून पोनमुडी यांच्या भ्रष्ट कृत्यांना पक्ष पाठीशी घालत आहे, असे समजायचे का ? असा पक्ष लोकशाहीला कलंकच आहे.

भाषाद्वेष्टे आणि हिंदुद्वेष्टे पोनमुडी !

काही मासांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) पोनमुडी यांच्या घरी धाड घातली होती. तेव्हाच तमिळनाडूमधील भ्रष्टाचार बाहेर येण्याची कुणकुण लागली होती. पोनमुडी म्हणजे ईडीने लक्ष्य करण्यातील दुसरे मंत्री होते. खरेतर कोणतेही मंत्री, खासदार, आमदार किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांचे हात गुन्हेगारी किंवा भ्रष्टाचार यांत बरबटलेले असायलाच नकोत; पण आज सर्रासपणे हे सर्वत्र घडते. यांपैकी कुणीही धुतल्या तांदुळासारखा शुद्ध आणि स्वच्छ असूच शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीला आळा घालणे हे हाताबाहेर गेले आहे.

पोनमुडी यांना जरी आता शिक्षा झालेली असली, तरी त्यांची आतापर्यंतची पार्श्वभूमी वादग्रस्त ठरली आहे. मागील वर्षी त्यांनी ‘हिंदी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा अधिक मौल्यवान आहे. जे हिंदी बोलतात, ते क्षुल्लक नोकर्‍यांमध्ये गुंतलेले आहेत. हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकतात’, असे विधान केले होते. तमिळी राजकारणी हिंदी भाषेचा दुःस्वास करतात. पोनमुडी यांचे हे विधान त्याच द्वेषातून आले आहे. तमिळी भाषा आणि संस्कृती यांच्याविषयी अस्मिता बाळगणे योग्य; मात्र त्यासाठी अन्य भाषांविषयी पराकोटीचा द्वेष का ? बहुसंख्य भारतीय बोलत असलेल्या हिंदी भाषेपेक्षा पोनमुडी यांना इंग्रजी भाषा जवळची वाटते. यावरून त्यांची गुलामगिरीची मानसिकता दिसून आली. हिंदी भाषेचा कंड शमवण्यासाठी स्वतः किती खालची पातळी गाठत आहोत, हे त्यांच्या लक्षात आले नाही. अशा मानसिकतेचे मंत्री विद्यार्थ्यांचे भले काय करणार ?

मध्यंतरी विरोधी पक्षांनी स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीला पोनमुडी यांचे समर्थन तर होते. त्या जोडीला त्यांनी या आघाडीचा उद्देशही थेट स्पष्ट केला. ‘ही आघाडी सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली आहे’, असे त्यांनी सांगितले. यातून ‘इंडिया’चा खरा चेहरा उघड झालाच, त्याहून अधिक पोनमुडी यांची हिंदुद्वेषी मानसिकता दिसून आली. ही सर्व उदाहरणे पहाता पोनमुडी यांची विद्वेषी आणि भ्रष्ट मनोवृत्ती आपल्या समोर येते.

द्रमुकचे खरे रूप !

पोनमुडी असोत किंवा आणखी कुणीही, प्रत्येकाच्या विचारसरणीतून द्रमुक पक्षाचे खरे स्वरूप उघड होतेच. द्रमुकची शिकवणच भारतद्वेषावर आधारित आहे. धर्मांतराचे कारस्थान रचणाराही हाच पक्ष आहे. द्रमुक पक्षावर सत्तेत आल्यापासून त्याच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत. पिढ्यान्‌पिढ्या हे प्रकार चालूच आहेत. हे सर्वकाही तमिळनाडूतील जनता ओळखून आहे; पण या कारस्थानांना किंवा अपप्रकारांना कुणीही वेसण घालायला सिद्ध नाही. खरेतर यावर नियंत्रण मिळवेल, असे तेथील कुणालाही जमणारच नाही. तमिळनाडूमध्ये हिंदुत्व तेवढ्या प्रमाणात सक्रीय नसल्याचाच हा परिणाम आहे. द्रमुकच्या या स्थितीकडे हिंदूंनी कानाडोळा करून चालणार नाही. हिंदूंनीच याविरोधात जागृती करायला हवी. वेळोवेळी द्रमुकचा खरा चेहरा उघड करायला हवा.

पोनमुडी यांना केलेला भ्रष्टाचार, द्रमुकचे मंत्री उदयनिधी यांनी केलेली सनातन धर्माविरोधी विधाने, तसेच द्रमुक पक्षातील नेत्यांची अन्य गैरकृत्ये पहाता हिंदूंनी या पक्षाला मतपेटीद्वारे धडा शिकवणे आवश्यक. ज्या पक्षामध्ये नवनिर्मितीचे, तसेच नवविचार करण्याचे सामर्थ्यच नसेल, तो पक्ष राष्ट्राची जडणघडण करणार कशी ? नास्तिकतावाद, हिंदुद्वेष, धर्मांतर, भ्रष्टाचार आणि सनातनद्वेष यांच्या बळावर राज्यकारभार चालवू पहाणार्‍या द्रमुक विचारसरणीचा नाश केल्यासच तमिळनाडूत खर्‍या अर्थाने आदर्श राज्यव्यवस्था उभारली जाऊ शकते, हे हिंदूंनी लक्षात घेऊन कृतीशील व्हावे !

नास्तिकतावाद, हिंदुद्वेष, धर्मांतर, भ्रष्टाचार आणि सनातनद्वेष करणार्‍या द्रमुक विचारसरणीचा नाश करायला हवा !