औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असतांना ‘तो धर्मनिरपेक्ष होता’, असे म्हणणे, हे कथित निधर्मीपणात कुठे बसते ?
हिंदु, हिंदुत्व आणि अपघाताने झालेले हिंदु !
देशात केंद्रामध्ये हिंदुत्वनिष्ठ शासन आल्यानंतर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड सातत्याने हिंदुद्वेष्ट्यांकडून केली जात आहे. धर्मांध मुसलमान नेत्यांनी, मौलवींनी (इस्लामचे धार्मिक नेते) मोदींना शिव्यांचा रतीब घालणे स्वाभाविक आहे; पण अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेले हिंदूही या संदर्भात थोडेही मागे नाहीत. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.
१७ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘जन्महिंदुरूपी विषारी किडीवर हिंदुत्वनिष्ठरूपी औषधांचा फवारा हवा, संस्कृत विद्यापिठाला विरोध करणारे जन्महिंदु नेते, हिंदुद्वेषाचे भूत मानगुटीवर बसल्याने बेताल बडबड करणारे जन्महिंदु अभिनेते कमल हसन आणि हिंदूंच्या धर्मग्रंथांना जाळण्यास सांगून इस्लामचा उदोउदो करणारे चंद्रशेखर यादव यांच्यासारखे जन्महिंदू’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
६. अत्यंत हीन आणि घृणास्पद वक्तव्ये करणारे जन्महिंदु हिंदुद्वेषी जारकीहोली यांचा निषेध करावा तेवढा थोडाच !
हिंदुविरोधी गरळ ओकणार्या कर्नाटक काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोली यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यांनी वाह्यात विधाने करतांना सर्व मर्यादा ओलांडल्या. ते म्हणाले, ‘‘हिंदु हा शब्द पार्शियन असून त्याचा अर्थ ‘घाण’ असा आहे. हा शब्द आमच्यावर का थोपवला जात आहे ?’’ पुढे अजून मुक्ताफळे उधळत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या ‘धर्मवीर’ उपाधीचा अपमान केला आणि ‘धर्मवीर उपाधीसाठी मराठी लोक लायक नाहीत’, असे अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले. एवढेच नव्हे, तर ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानांच्या साहाय्याने मोगलांविरुद्ध लढा देऊन मशीद उभारली’, असेही ते म्हणाले. स्वतः जन्माने हिंदु असूनही हिंदुविरुद्धच अशी अनैतिहासिक विधाने करणार्या सतीश जारकीहोली यांचा कोणत्या शब्दात निषेध करावा ? ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजून माराव्या पैजारा’, याच शब्दांत त्यांचा निषेध करावा लागेल.
७. मतांसाठी छत्रपती संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणू नका म्हणणारे जन्महिंदु नेते !
ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदु धर्मासाठी अनेक दिवस अमानुष छळ सहन केला, स्वतःच्या देहाचे तुकडे तुकडे होऊ दिले; पण मुसलमान धर्म स्वीकारला नाही, त्या छत्रपती संभाजींना ‘धर्मवीर’ म्हणू नका, तर ‘स्वराज्यरक्षकच’ म्हणा, अशी अजब मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकदा विधानसभेत विरोधी पक्षनेते असतांना केली होती. ‘स्वतः जन्माने हिंदु असूनही आपल्याच धर्माविषयी एवढी घृणा अजित पवार यांना का वाटावी ?’, हे काही समजत नाही ? छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ तर होतेच; पण स्वधर्माविषयी उरात जाज्वल्य आणि कडवा अभिमान बाळगणारे अन् प्रसंगी आपल्या धर्मरक्षणासाठी प्राण देणारे ‘धर्मवीर’ही होते, हे मान्य करायला आपल्या हिंदूंना लाज का वाटावी ? केवळ मुसलमान मतांसाठीच का ? छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ होते. हे स्वराज्यही हिंदूंसाठी आणि हिंदूंचेच होते ना ?
८. औरंगजेबाला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल करणारे राष्ट्रवादीच्या आव्हाडांसारखे जन्महिंदू !
अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक पाऊल पुढे टाकत ‘ट्वीट’ केले, ‘औरंगजेब हा क्रूर आणि हिंदुद्वेष्टा नव्हता. तसा तो असता, तर त्याने विष्णूचेही मंदिर तोडले असते’, असे औरंगजेबाला धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र बहाल केले !
९. औरंगजेबाच्या समाधीसमोर नतमस्तक होणारे जन्महिंदू प्रकाश आंबेडकर !
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे तर औरंगजेबाच्या थडग्याच्या दर्शनार्थ गेले. थडग्यावर पुष्पचक्र वाहिले आणि थडग्याच्या समोर नतमस्तक झाले. औरंगजेबाचा सर्व इतिहास हिंदुद्वेषाने बरबरटेला आहे. त्याने लाखो हिंदूंना साम, दाम, दंड आणि भेद या मार्गाने धर्मांतरित केले. हिंदूंची सहस्रो मंदिरे पाडली. काशीविश्वनाथ, मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील कृष्णाचे मंदिर उद्ध्वस्त करण्याचे औरंगजेबाच्या आज्ञापत्राच्या प्रती आजही उपलब्ध आहेत. त्याने धर्मांतर करण्यास नकार देणार्यावर ‘जिझिया’ नावाचा कर लावला. याच कारणासाठी त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा मानवतेला लाज वाटावी, असा अमानुष छळ करून त्यांच्या देहाचे शेवटी तुकडे करून ते फेकून दिले. तरीही औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असतांना ‘तो धर्मनिरपेक्ष होता’, असे त्याला प्रमाणपत्र बहाल करणे याला निर्लज्जपणा म्हणावा कि अन्य काय म्हणावे ? औरंगजेबाच्या थडग्यावर पुष्प वहाणार्या प्रकाश आंबेडकर यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुसलमानांविषयी काय मते होती ?’, हे वाचले कि नाही, याविषयी शंका येते. एक तर ती मते त्यांनी वाचली नसावीत किंवा वाचूनही त्यांनी केवळ हिंदुद्वेषापायी आणि मुसलमानांच्या मतांसाठी असे घृणित कृत्य केले असावे.
१०. हिंदुविरोधी वक्तव्ये करणार्या नेत्यांना मते देणारे जन्महिंदू !
भारतातील भाजपच्या विरोधी असणारे सर्व राजकीय पक्ष आणि नेते यांचा हिंदुद्वेष पराकोटीला पोचल्याचे पाहून पुष्कळ वाईट तर वाटतेच; पण चिंताही वाटते. हिंदूंचा द्वेष करूनही लाखो हिंदू अशा हिंदुद्वेष्ट्या पक्षांना मतदान करतात, तेव्हा तर त्या चिंतेत अधिकच भर पडते. वर्ष २०२२ च्या गोव्यातील विधानसभेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पक्षाला कोणताही जनाधार नसतांना प्रवेश केला होता. या संबंधात त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, ‘‘मी येथे केवळ हिंदूंच्या मतात फूट पाडण्यासाठी आणि इतर पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रवेश केला आहे.’’ हिंदुविरोधी एवढे वक्तव्य उघडपणे करूनही हिंदू त्यांनाच मते देतात, या दुर्दैवाला काय म्हणावे ? येथील साम्यवादी पक्ष असो कि अन्य धर्म आणि राष्ट्र द्रोही पक्ष असोत, ते नेहमी रा.स्व. संघ, हिंदु जनजागृती समिती, विश्व हिंदु परिषद अशा हिंदूंसाठी कार्य करणार्या संघटना असोत, हिंदूंची बाजू घेणारे राजकीय पक्ष असोत कि वृत्तपत्रे यांच्यावर बंदीची आणि हिंदूंना जागृत करण्यासाठी, संघटित करण्यासाठी जे साधू-संत, विचारवंत कार्य करतात, त्यांच्या अटकेची मागणी करत असतात; पण हिंदूंविरुद्ध सतत जहाल वक्तव्य करणारे धर्मांध मुसलमान नेते आणि मौलवी, आतंकवादी अन् आतंकवादी संघटना, भारतात बांगलादेश आणि म्यानमार येथून घुसखोरी करणारे लाखो रोहिंग्या अन् मुसलमान घुसखोर, देशद्रोही कारवाया करणार्या आणि परदेशी पैशांवर पोसल्या जाणार्या स्वयंसेवी संघटना, हिंदूंचे धर्मांतर करणारे ख्रिस्ती पाद्री आणि मुसलमान मौलवी, प्रेमाच्या जाळ्यात फसवून लाखो हिंदु मुलींच्या जीवनाचा सर्वनाश करणारे लव्ह जिहादचे षड्यंत्र, यावर बंदी घालण्याची मागणी कधी करत नाहीत !
११. हिंदुहिताचे कायदे अमान्य असणारे हिंदु आणि राष्ट्र द्रोही जन्महिंदु नेते अन् त्यांना मते देणारे जन्महिंदू !
जे जे देश आणि हिंदुहिताचे असते, ते या जन्माने हिंदू; पण हिंदुद्वेषाचा वसा घेतलेल्यांना ते त्यांना मान्य नसते. मग तो नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एन्.आर्.सी.), लोकसंख्या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा असो कि अन्य काही, या अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या नेत्यांना जम्मू -काश्मीरचे कलम ३७० रहित करणे (जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम), मुसलमान महिलांच्या हितासाठी तलाकवर बंदी घालणे, हेही मान्य नसते. याहूनही आश्चर्य आणि वैषम्य याचे वाटते की, हिंदूची कबर खोदणार्या या हिंदु आणि देश द्रोही नेत्यांना अन् त्यांच्या राजकीय पक्षाला हिंदूच मतदान करतात. कितीही अपमान केला किंवा लाथा घातल्या, तरी लाचार हिंदु मतदार आपल्याला मतदान करतात, असे दिसून आल्यानंतर हे हिंदुद्वेष्टे नेते हिंदुहिताचा विचार कशाला करतील ? उलट यामुळे त्यांचा दुहेरी लाभ होतो. या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना हिंदूंसमवेत मुसलमान आणि ख्रिस्ती यांचीही भरभरून मते मिळतात.
१२. प्रभु श्रीरामांनाही टीकेचे लक्ष्य करणार्या जन्महिंदूंना जाब विचारण्यासाठी हिंदू कधी एकत्र येणार ?
हिंदु, हिंदु धर्म, हिंदु साधू-संत, विचारवंत यांच्याविषयीचा द्वेष अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांच्या मनात ठासून भरला आहे. केवळ हिंदूंनीच नाही, तर संपूर्ण जगातील मानवजातीने आपल्यासमोर ज्यांचा आदर्श ठेवावा, अशा श्रीरामांनाही आपल्या टीकेचे लक्ष्य करण्यात या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना ना मनाची, ना जनाची लाज वाटते. या हिंदुद्वेष्ट्या हिंदु नेत्यांनी अयोध्येतील रामजन्मभूमीवरच्या मंदिराला कायम विरोध केला. श्रीरामाचे पात्र काल्पनिक ठरवले, त्यांच्या जन्माचे प्रमाणपत्र मागितले. आता काँग्रेसचे एक फुटक्या तोंडाचे नेते मणीशंकर अय्यर यांची रामाविषयीची द्वेषभावना परत एकदा उफाळून आली. याच मणीशंकर अय्यर यांनी अंदमानमधील हुतात्मा स्मारकावरील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काव्यपंक्ती हटवल्या होत्या. नुकतेच मणीशंकर बरळले, ‘‘राजीव गांधी यांनी अयोध्येत राममंदिराचा शिलान्यास करणे, हे मोठे पाप होते; म्हणूनच त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.’’ त्यांच्या या वक्तव्याविषयी काँग्रेस पक्षातील एका तरी नेत्याने जाब विचारला का ? उलट राममंदिराचा शिलान्यास करणे, हे मोठे पाप समजणार्या मणीशंकर अय्यर यांना पुढे काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती देऊन त्यांच्या रामद्रोही वक्तव्याविषयीचे बक्षीस देण्यात आले. प्रश्न असा पडतो की, या हिंदुत्वद्रोही नेत्यांना वठणीवर आणण्यासाठी देशातील हिंदु समाज कधी जागृत आणि संघटित होणार ?
– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.