कळंगुट (गोवा) येथे पर्यटकाला लुबाडणार्‍या चौघांना अटक

गळ्यातील सोनसाखळी हिसकावणारे ४ संशयित पोलिसांच्या कह्यात

पणजी, २२ डिसेंबर (वार्ता.) : कर्नाटक येथून आलेल्या पर्यटकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्‍या ४ संशयितांना कळंगुट पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यटक संतोष एस्.ए. यांनी यासंबंधी तक्रार नोंदवली आहे. तक्रारदार संतोष एस्.ए. ‘लिटल गोवा’ उपाहारगृहाजवळ असतांना संशयितांनी आरंभी त्याचा भ्रमणभाष आणि त्याच्याजवळील रोख रक्कम हिसकावून घेतली अन् नंतर त्याच्या गळ्यातील २ लाख रुपये किमतीच्या २ सोनसाखळ्या हिसकावून घेतल्या.

अन्वेषण करतांना संशयित मोर्सलिन मोल्ला (वय २० वर्षे) राजू मोल्ला (वय १९ वर्षे), अख्तर अली (वय २४ वर्षे) आणि रकीफुल मोंडल (वय १९ वर्षे) हे बंगालचे रहिवासी असलेल्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ तुटलेल्या सोनसाखळ्या आढळल्या. संशयितांना पोलीस ठाण्यात आणून अन्वेषण केले असता त्यांनी गुन्हा केल्याची स्वीकृती दिली. सर्व संशयितांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.