नवी देहली – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी विविध रुग्णालयांतील आकडेवारीचा आढावा घेत म्हटले की, देशभरात वायूप्रदूषण वाढल्याने श्वसनसंबंधी आजारांच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने हवामान पालट आणि मानवी आरोग्य यांवर राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केला असून यांतर्गत १८ राज्यांतील जवळपास ८० रुग्णालयांत गतीने वाढणार्या श्वसनसंबंधी आजारांवर निरीक्षणास आरंभ केला आहे.
मंडाविया यांनी राज्यसभेत माहिती देतांना म्हटले की, या निरीक्षणाचा उद्देश हा विविध शहरांतील रुग्णालयांच्या वायूच्या गुणवत्तेच्या स्तरांशी संबंधित आढाव्यांतून तीव्र श्वसनसंबंधी आजारांच्या तीव्रतेकडे लक्ष देण्याचा आहे. ते पुढे म्हणाले की, ‘ए.आर्.आय. डिजिटल निरीक्षण डेटा’ ऑगस्ट २०२३ मध्ये चालू करण्यात आले आहे.