बांगलादेशींना शासकीय कागदपत्रे मिळवून देणार्‍यांवर कारवाई करा !

नारायणगाव (जिल्‍हा पुणे) येथील ग्रामस्‍थांची मागणी !

प्रतिकात्मक छायाचित्र

नारायणगाव (जिल्‍हा पुणे) – घुसखोरी करून भारतात आलेल्‍या बांगलादेशी नागरिकांना पदाचा अपवापर करून ग्रामपंचायतीच्‍या माध्‍यमातून रहिवासी दाखला देऊन त्‍यांना आधार कार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका, मतदान ओळखपत्र आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्‍यात आला. या योजनांचा लाभ मिळवून देण्‍यास साहाय्‍य करणार्‍या व्‍यक्‍ती, पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांची निष्‍पक्षपाती चौकशी करून संबंधितावर गुन्‍हा नोंद करावा, अशी मागणी नारायणगावच्‍या ग्रामस्‍थांनी निवेदनाद्वारे केली आहे. याविषयीचे निवेदन ‘ग्रामोन्‍नती मंडळा’चे उपाध्‍यक्ष सुजित खैरे, डी.के. भुजबळ, नामदेव खैरे, गणेश वाजगे आदींनी नारायणगाव पोलीस ठाण्‍याचे फौजदार व्‍ही.व्‍ही. धुर्वे यांना दिले आहे.

निवेदनात म्‍हटले आहे की, आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) १४ डिसेंबर या दिवशी नारायणगाव परिसरात रहाणार्‍या ७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. या आरोपींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आहे. ७ पैकी ४ आरोपींची नावे नारायणगावच्‍या मतदारसूचीत आहेत. नारायणगाव ग्रामपंचायतीकडून रहिवासी दाखला घेऊन नारायणगाव येथे झालेल्‍या ‘कॅम्‍प’मध्‍ये आरोपींनी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र काढले आहे. पदाचा अपवापर करून बांगलादेशी नागरिकांना शासकीय कागदपत्रे काढून देण्‍यास साहाय्‍य करणार्‍या दोषींची चौकशी करून त्‍यांच्‍यावर गुन्‍हे नोंद करावेत.

संपादकीय भूमिका :

अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना ते लक्षात येत नाही का ?