आज ‘गोवा मुक्तीदिन’ आहे. त्या निमित्ताने…
१. पोर्तुगिजांच्या विस्ताराला आडकाठी
वर्ष १५५५ची गोष्ट ! १५५० च्या दशकात पोर्तुगीज वसाहत शक्ती शिखरावर होती. त्यांनी कॅलिकतच्या (आताचे कालिकत येथील) झामोरिन्स यांचा नाश केला, विजापूरच्या सुलतानाला हरवले, गुजरातच्या सुलतानला हरवून दमण कह्यात घेतले, मैलापूर येथे वसाहत वसवली, मुंबई कह्यात घेतली आणि गोव्याला त्यांचे मुख्यालय बनवले. तेथे कोणतेही आव्हान नसतांना त्यांनी प्राचीन कपालीश्वराच्या मंदिराची नासधूस करून त्यावर एक चर्च बांधले. त्यांचे पुढील लक्ष्य होते मंगळुरूचे अतिशय महत्त्वाचे बंदर. त्यांच्या दुर्दैवाने मंगळुरूच्या दक्षिणेला १४ कि.मी. अंतरावर ‘उल्लाल’ नावाची एक लहान वसाहत होती. तेथे ३० वर्षीय राणी अब्बाक्का चौटा ही राज्य करत होती.
२. राणी अब्बाक्का यांना कमकुवत समजण्याची पोर्तुगिजांची चूक
आरंभी राणी अब्बाक्का चौटा हिला ‘कमकुवत राणी’ समजून तिला पकडून गोव्याला आणण्यासाठी पोर्तुगिजांनी काही सैनिक आणि बोटी पाठवल्या. त्या बोटी कधीच परत आल्या नाहीत. त्यामुळे आश्चर्यचकित आणि संतप्त होऊन पोर्तुगिजांनी सुप्रसिद्ध अॅडमिरल डॉम आल्वारु द सिल्वेरा याच्या नेतृत्वाखाली जहाजांचा एक मोठा ताफा पाठवला; परंतु तो अॅडमिरलसुद्धा पुष्कळ जखमी होऊन रिक्त हस्ते परतला. त्यानंतर जहाजांचा आणखी एक ताफा त्यांनी पाठवला; पण तोही ताफा पाठवलेल्या दलातील काही मोजक्याच जखमी सैनिकांसह परत आला. शेवटी पोर्तुगिजांनी मंगळुरू बंदर आणि किल्ला कह्यात घेण्यासाठी किल्ल्याच्या सोयीस्कर अंतरावरून राणी अब्बाक्का चौटा यांना टक्कर देण्याची योजना आखली असावी; कारण शेवटी किल्ला आणि ते बंदर त्यांच्या कह्यात आले.
३. राणी अब्बाक्का यांचे युद्धतंत्र
मंगळुरूच्या या यशस्वी कामगिरीनंतर त्यांनी जू पिक्सोटो नावाच्या एका लष्करी अधिकार्याला पुष्कळ मोठ्या सैन्यासहित उल्लालवर चढाई करायला पाठवले. त्या वेळी त्यांना उल्लाल कह्यात घेणे आणि अब्बाक्काला बंदी बनवणे एवढेच सांगितले होते. हे नियोजन यशस्वी होण्याविषयी तीळमात्रही शंका नव्हती; कारण ती ३० वर्षीय राणी आपल्या अवघ्या सैनिकांसह इतक्या प्रचंड, शक्तीशाली आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज सैन्याशी लढून जिंकणे अशक्यप्राय होते.
पोर्तुगीज जेव्हा उल्लालला पोचले, तेव्हा तिथे कुणीच नव्हते. सारे कुठे गेले असावेत ? याची कुणाला कल्पना नव्हती. पोर्तुगीज इतस्तत: भटकले, थोडी विश्रांती घेतली आणि ईश्वराचे आभार मानत बसले होते. ‘आपल्याला यश मिळाले’, असे त्यांना वाटत असतांनाच निवडक २०० शिपायांसह राणी अब्बाक्काने त्यांच्यावर आक्रमण केले. सगळीकडे एकच गोंधळ माजला आणि पोर्तुगीज सैनिक अचानक झालेल्या आक्रमणाने गांगरून गेले होते. कितीतरी पोर्तुगीज सैनिक न लढताच मृत्यूमुखी पडले.
लष्करी अधिकारी जू पिक्सोटोही मारला गेला. या वेळी ७० जणांना कैद केले गेले आणि बाकीचे पळून गेले. त्यानंतर राणी अब्बाक्का स्वतःच्या सैन्यासहित मंगळुरूला रवाना झाली आणि तेथे तिने किल्ल्याला वेढा दिला अन् यशस्वीरित्या आत प्रवेश केला. तेथील पोर्तुगीज आधिकारी मास्कारेन्हस याला ठार मारून त्याच्या उरलेल्या सैनिकांना किल्ला रिकामा करण्यास सांगितले. तेवढ्यावरच न थांबता ती मंगळुरूच्या उत्तरेला १०० कि.मी. अंतरावरील पोर्तुगीज वसाहत असलेले कुंदापूर कह्यात घेण्यासाठी गेली.
४. आपल्या गुलामीला उत्तरदायी आपणच !
दुर्दैवाने तिच्याशी कोणतेही कर्तव्य नसलेल्या तिच्या देशद्रोही पतीला लाच देऊन त्याच्या साहाय्याने पोर्तुगीज अब्बाक्काला कह्यात घेऊ शकले. त्यांनी राणीला अटक करून कैदेत ठेवले. तिने प्रतिकार केला. पळून जायचा प्रयत्न करत असतांना ती मारली गेली.
आपल्याला १ सहस्र वर्षे भोगाव्या लागणार्या गुलामीला आपणच शत्रूची बाजू घेतल्याने उत्तरदायी आहोत. राणी अब्बाक्का चौटा जैन धर्मीय होती. तिने तिच्या हिंदु आणि मुसलमान असलेल्या सैन्याच्या साहाय्याने ४ दशके म्हणजे वर्ष १८५७ ला झालेल्या प्रथम स्वातंत्र्यलढ्याच्या ३०० वर्षांपूर्वी पोर्तुगिजांविरुद्ध लढा दिला होता. भारतियांनी तिच्या साहसी राजवटीविषयी किती कृतज्ञता व्यक्त केली ? आपण तिला सर्वथा विसरलो. तिच्या नावाने टपालाचे तिकीट जारी केले, एका बोटीला तिचे नाव दिले खरे; परंतु जिला ‘राष्ट्रनायिका’ घोषित करणे योग्य होते, तिचे संपूर्ण भारतात केवळ दोनच पुतळे उभारले.
भारतीय तटरक्षक जहाज ‘आय.सी.जी.एस्. राणी अब्बाक्का’ हे हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड येथे बांधलेल्या ५ तटीय गस्ती जहाजांच्या मालिकेतील पहिले जहाज अब्बाक्का महादेवी यांच्या नावावर आहे. तीच जर युरोपियन किंवा अमेरिकन असती, तर शालेय पुस्तकांमध्ये तिच्याविषयी एक अध्याय वाचायला मिळाला असता. आश्चर्य हेच की, या राणीविषयी आपण अजून काहीच कसे ऐकले नाही !
(संदर्भ : विविध संकेतस्थळे)