लग्‍न कि ‘इव्‍हेंट’ ?

‘प्री-वेडिंग फोटो शूट’

सध्‍या लग्‍नसराई चालू आहे. सध्‍या बरेच जण लग्‍न या १६ संस्‍कारांपैकी एक असलेल्‍या संस्‍काराकडे एक ‘इव्‍हेंट’ (कार्यक्रम) या दृष्‍टीने पहातात. हा ‘इव्‍हेंट’ चालू होतो ‘प्री-वेडिंग फोटो शूट’पासून (लग्‍नापूर्वी वधू-वरांचे एकमेकांसमवेत छायाचित्रे काढणे) ! लग्‍नातील धार्मिक विधींचे महत्त्व लक्षात न आल्‍याने ते परिपूर्ण करण्‍याकडेे कुणाचेच लक्ष नसते; दिखाऊपणाकडेच बहुतेकांचा कल दिसतो. मिरवणे, सजावट करणे आणि गाण्‍यांवर नाचणे, हेच या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू होतात. हळद, मेंदी, संगीत आणि नंतर स्‍वागत समारंभ यांतच सर्वजण रमलेले दिसतात. लग्‍नापूर्वीचा वाङ्‍निश्‍चय (साखरपुडा) विधीही पाश्‍चात्त्य विकृतीप्रमाणे ‘रिंग सेरेमनी’ (मुलाने गुडघ्‍यावर बसून होणार्‍या मुलीला अंगठी घालणे) म्‍हणून साजरा होतो. हाही एवढा थाटात होतो की, अजून केवळ अक्षता डोक्‍यावर घातल्‍या असत्‍या, तर लग्‍नच झाले असते.

हळद, मेंदी, संगीत या प्रत्‍येक ठिकाणी वेगवेगळी खर्चिक सजावट, पोशाख, रंगभूषा, केशभूषा केली जाते. या सर्व कार्यक्रमांवर प्रचंड अनावश्‍यक व्‍यय केला जातो. हिंदु विवाहपद्धतीत ‘सप्‍तपदी’ हा अतिशय अर्थपूर्ण आणि ‘आयुष्‍यभर कसे वागावे ?’, याचा उपदेश करणारा सुंदर विधी आहे. आता ‘फर्स्‍ट डान्‍स स्‍मोक’ (दांपत्‍याने पांढर्‍या रंगाच्‍या कृत्रिम धुरातून (म्‍हणजे ढगातून) चालणे !) करण्‍यावर अधिक वेळ वाया घालवला जातो. पाश्‍चात्त्य देशात यानंतर इतरांना तिथे नाचण्‍यासाठी निमंत्रित केले जाते, तेवढे अजून इथे बाकी आहे. या कृतींना कुठलाही शास्‍त्राधार, परंपरा नाही, हे लक्षात न घेता आधुनिकतेच्‍या नावाखाली आणि इतरांना दाखवण्‍यासाठी या पाश्‍चात्त्य विकृतीचे अंधानुकरण केले जात आहे. यात वधू-वरांना उचलणे, जोडे लपवणे आदी अनावश्‍यक गोष्‍टीही घुसल्‍या आहेत. पारंपरिक साडी कमी वेळ आणि अधिकाधिक वेळ बाह्या नसलेले लांब झगे (वनपीस) घातले जातात. त्‍यात ओढणी केवळ हातावर घेण्‍यासाठी असते. काळा रंग हिंदु धर्मात निषिद्ध असून बहुतेक जण त्‍या रंगाचे कपडे स्‍वागत समारंभाला घालून येतात. आता ‘लाजणारी नवरी’, ही संकल्‍पना नसून ती स्‍वतःच अंगप्रदर्शन करत नाचते !

लग्‍नातील मंडपदेवता प्रतिष्‍ठा, मंगलाष्‍टके, अक्षतारोपण, गौरीहरपूजन, मधुपर्कपूजन, कन्‍यादान, मंगलसूत्रबंधन, पाणिग्रहण, लाजाहोम हे सारे अत्‍यंत अर्थपूर्ण आणि सुखी आयुष्‍याचे संस्‍कार अन् देवतांना आवाहन करणारे विधी आहेत. केवळ ‘इव्‍हेंट’मध्‍ये ते चैतन्‍य कसे येणार ? त्‍यामुळे लग्‍न हा ‘इव्‍हेंट’ न्‍यून आणि विधी अधिक होईल, याकडे विशेषतः वडीलधार्‍यांनी लक्ष द्यायला हवे !

– सौ. प्रज्ञा जोशी, पनवेल.