१. मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त करूनही कारवाई नाहीच !
वर्तमानपत्र उघडल्यानंतर जशा आत्महत्येच्या आणि बलात्काराची वृत्ते समोर येतात, तशीच वृत्ते गुटखा पकडल्याच्या किंवा धाड घालून गुटखा हस्तगत केल्याचीही येत असतात. मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त केला जातो. संबंधितांवर कारवाई केल्याचेही सांगितले जाते; पण ती कारवाई काय असते, ते समजत नाही. केवळ दंड करून सोडून दिले जाते. त्यामुळे गुटख्याशी संबंधित दुष्टचक्र चालूच रहाते. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच तरुण पिढी यांचे गुटखा वापराचे प्रमाण अधिक आहे.
२. गुटखाविक्री सर्रास चालूच !
राज्यात गुटख्यावर बंदी असतांनाही अनेक ठिकाणी त्याचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला जातो. त्याची विक्री छुप्या मार्गाने आणि सर्रास चालूच असते. काही ठिकाणी तर उघडपणे गुटखाविक्री होते. असे करणार्यांना मोठ्या मंडळींचे पाठबळ मिळते. अन्न आणि औषध प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जाते.
३. सरकारच्या आदेशाची पायमल्ली !
‘शाळा-महाविद्यालय परिसरात १०० मीटरपर्यंत गुटखा, पान, तंबाखू, सिगारेट आदी वस्तूंची विक्री केली जाऊ नये, पान टपर्या नसाव्यात’, असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला असूनही त्याची कार्यवाही होत नाही. विद्यार्थी आणि तरुण पिढी या नशेपासून खरेतर दूर रहायला हवी; पण तसे होत नाही. सरकार धोरण आखते; परंतु केवळ धोरण आखून उपयोग नाही. त्यांची प्रभावी कार्यवाही व्हायला हवी !
४. व्यसनाधीनतेला विरोध करणार्या मुख्याध्यापकांनाच धमकी !
सरकारच्या जोडीला समाज, शिक्षणसंस्था, स्वयंसेवी संस्था यांनीही या दिवशी पुढाकार घ्यायला हवा; परंतु शिक्षण संस्थाचालक यासंदर्भात उदासीन असतात. मुलांच्या भवितव्याचा विचार करणार्या मुख्याध्यापकांनी याविरोधात तक्रार केल्यास त्यांच्यावरच आक्रमण करण्याची धमकी आणि जिवे मारण्याची सुपारी दिली जाते. मध्यंतरी मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी त्यांनी शाळेजवळची टपरी हटवण्यासाठी तक्रार केली, तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण झाले. मुख्यमंत्र्यांनी त्यांची विचारपूस केली. वैद्यकीय साहाय्य दिले, ते वेगळे ! खरेतर शासन-प्रशासनाने हे गंभीर सूत्र लक्षात घेऊन कठोर कार्यवाही करायला हवी. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी झटणार्या शाळांच्या मुख्याध्यापकांना संरक्षण द्यायला हवे.
५. युवा पिढी व्यसनाधीन न होण्यासाठी प्रयत्न व्हावेत !
आपली युवा पिढी आणि शालेय विद्यार्थी व्यसनाधीन होऊ नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६० ते ६५ टक्के लोकसंख्या, म्हणजे ३५ ते ४० टक्के वयोगटातील तरुण भारतात आहेत. या तरुणाईच्या जोरावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पहात आहोत; पण तरुण पिढी व्यसनांच्या मागे लागल्यास भवितव्य कठीण आहे. निवडणुकीच्या काळातही सर्रास दारूविक्री केली जाते. गुटखा, धूम्रपान यात युवक वर्ग व्यसनाधीन होऊन त्याच्या आहारी जातो. अनेक युवक व्यसनाधीन होतात. व्यसनासाठीही गुन्हेगारीकडेही वळतात.
६. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक स्तरांवर युवकांसाठी प्रयत्न व्हावेत !
अमली पदार्थ किंवा गुटखा विक्री यांना बहुतांश वेळा राजकीय नेत्यांचे पाठबळ असते. त्यामुळे गुटखा मावा, सुगंधी तंबाखू, दारू यांच्या तस्करीकडे लक्ष दिले जात नाही. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक या तिन्ही पातळ्यांवर युवकांसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, अन्यथा गुटख्यासह अन्य मादक द्रव्यांची तस्करी चालू राहील आणि विद्यार्थी अन् युवक कमकुवत होतील.
७. युवा शक्तीला विधायक वळण द्यायला हवे !
स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘युवा शब्दात वायू, म्हणजे गती आहे.’ त्यामुळे युवा शक्तीला विधायक वळण दिले पाहिजे. समाजाप्रती प्रेम, कणखर राष्ट्रभक्ती आणि निर्व्यसनी युवा पिढी निर्माण होणे अन् घडवणे हेही शिक्षण संस्थेकडून अपेक्षित आहे.
८. महासत्तेकडे वाटचाल करणार्या भारताने व्यसनाधीनता रोखावी !
सध्याच्या काळात अनेक युवक नैराश्याने ग्रासलेले आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध नाही. व्यसनांच्या माध्यमातून ते जीवनाच्या टोकालाच पोचतात. भविष्यात आपला देश ‘व्यसनाधिनांचा देश’ म्हणून ओळखला जाईल. देश महासत्तेकडे वाटचाल करत असतांना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. गुटखा तस्करी आणि विक्री करणार्यांवर कठोर कारवाई आवश्यक आहे.
– श्री. दिलीप देशपांडे, जामनेर, जिल्हा जळगाव.