‘२.९.२०२३ या दिवशी राख (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. वसंत किसन गायकवाड यांचे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांची पत्नी श्रीमती नर्मदा वसंत गायकवाड (वय ६८ वर्षे) यांच्याविषयी त्यांची ज्येष्ठ मुलगी सौ. धनश्री शिंदे (वय ४८ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. दिवसभर नामस्मरण करणे आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ अन् त्यांच्या जन्मोत्सवाचे विशेषांक पाहून सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाणे
‘माझ्या आईला ४० वर्षांपासून संधिवात आहे. ती स्वतः काहीच करू शकत नाही. तिचे सगळे वडीलच करायचे. ती दिवसभर नामस्मरण करते आणि सतत गुरुदेवांचे स्मरण करून त्यांच्याशी बोलते. ती गुरुपौर्णिमा आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाचे विशेषांक, दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पहात असते. अशा प्रकारे ती देवाच्या अनुसंधानात असते.
२. वडिलांना रुग्णालयात नेल्यावर आई स्थिर असणे
वडिलांना बरे नसल्याने रुग्णालयात नेले. तेव्हा आई एकदम स्थिर होती. दोघांचा एकमेकांवर पुष्कळ जीव होता. मला वाटायचे, ‘‘आई-वडील या दोघांपैकी एकाला जरी काही झाले, तर दुसर्याचे कसे होईल ?’’ आई मात्र या परिस्थितीतही स्थिर राहिली. वडील रुग्णालयात असतांनाही आईची विचारपूस करायचे. आधुनिक वैद्यांनी ‘वडील आता दोन दिवसच रहातील’, असे सांगितल्यावर ‘आई-वडिलांची भेट व्हावी’, या उद्देशाने आम्ही वडिलांना घरी आणले.
३. वडिलांना घरी आणल्यावर त्यांनी आईला नमस्कार करणे, खुणेनेच ‘जेवलीस का ?’, असे विचारणे आणि तेव्हाही आईच्या चेहर्यावर पुष्कळ स्थिरता जाणवणे
‘वडिलांना नाकातून नळ्या घातलेल्या आईने पाहिल्यावर ती हे सहन करेल का ?’, असे मला वाटत होते. वडिलांना रुग्णालयातून घरी आणल्यावर मी आणि माझी बहीण (सौ. लक्ष्मी पाटील, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३३ वर्षे) आम्ही आईला विचारले, ‘‘वडिलांना बाहेरच्या खोलीत ठेवूया कि तुझ्या खोलीत ठेवूया ?’’ ती म्हणाली, ‘‘माझ्या समोरच्या पलंगावर ठेवा.’’ वडिलांना आणल्यानंतर तिच्या जवळच्या पलंगावर त्यांना झोपवले. तेथे त्यांना ‘ऑक्सिजन’ लावला होता. घरी नेल्यावर वडिलांनी आईकडे पाहिले आणि तिला हात जोडून नमस्कार केला. तिला खुणेनेच त्यांनी ‘जेवलीस का ?’, असे विचारले. तेव्हा आईच्या चेहर्यावर पुष्कळ स्थिरता जाणवत होती. ‘तिच्याकडे पाहून काही झाले आहे’, असे वाटतच नव्हते. त्यानंतर वडिलांनी डोळे मिटले, ते कायमचेच !
४. वडिलांची अवस्था लक्षात येऊनही आई न रडणे आणि त्यांचे निधन झाल्याचे कळल्यावरही ती शांत असणे
मृत्यूच्या आदल्या दिवसापासून वडिलांची प्रकृती पुष्कळ खालावली होती. आईच्या हे सर्व लक्षात येत होते; परंतु याकडे साक्षीभावाने पाहून ती शांत पडून राहिली होती. त्यांची ही स्थिती लक्षात येऊनही ती रडली नाही. ती स्थिर होती. ‘वडिलांचा मृत्यू झाला आहे’, हे कळल्यावरही ती शांत होती.
५. ‘वडिलांचे निधन झाल्यावर ती कृष्ण आणि गुरुदेव यांच्याशी सतत आतून बोलत आहे’, असे जाणवणे आणि तिच्या चेहर्यावर लहान मुलासारखा निरागस भाव जाणवणे
काही नातेवाईक आल्यावर आई रडायची. तेव्हा तिचे हे रडणे भावनिक वाटत नव्हते. तिची स्थिरता पाहून आम्हाला सतत गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) कृतज्ञता वाटत होती. ‘वडिलांचे निधन झाल्यावर ती कृष्ण आणि गुरुदेव यांच्याशी सतत आतून बोलत आहे’, असे मला जाणवत होते. तिच्या चेहर्यावर लहान मुलासारखा निरागस भाव जाणवत होता. ती कृष्णाला सहजपणे म्हणत होती, ‘कृष्णा, तू माझे ऐकले नाहीस.’ (‘वडिलांच्या आधी आपण जायला पाहिजे होते’, असे तिला वाटत होते.) ती प्रत्येक प्रसंगाकडे साक्षीभावाने पहात होती. एवढ्या कठीण प्रसंगातही ती स्थिर होती. तिचा चेहरा एकदम शांत वाटत होता.
‘हे सर्व गुरुदेवांनी लिहून घेतले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. धनश्री शिंदे (श्रीमती नर्मदा गायकवाड यांची मोठी मुलगी), अहिल्यानगर (१५.९.२०२३)